धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महायुतीच मार्गी लावेल - जानकर
By Admin | Updated: October 7, 2014 00:12 IST2014-10-07T00:00:44+5:302014-10-07T00:12:52+5:30
औंढा नागनाथ : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन महादेव जानकर यांनी दिले.

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महायुतीच मार्गी लावेल - जानकर
औंढा नागनाथ : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही; परंतु मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी केल्यास आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले.
कळमनुरी विधानसभा मतदार संघातील भाजपा, रिपाइं आठवले, शिवसंग्राम पक्ष व राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अॅड. माधवराव नाईक यांच्या प्रचारार्थ कृषी उपबाजार समितीच्या मैदानावर जाहीर सभा झाली. मंचावर भाजपाचे पांडुरंग पाटील, माजी खा. सुभाष वानखेडे, तेजकुमार झांझरी, सुरजित ठाकूर, राम नागरे, नामदेव खेंबाळे, अॅड. के.के. शिंदे, अॅड. ढाले, गणेश ढाले, शरद पाटील व शिवलिंग शिवाचार्य महाराज आदींची उपस्थिती होती. जानकर म्हणाले की, भाजपा- रासप आघाडीमध्ये १० जागा देण्यात आल्या होत्या; परंतु दुर्दैवाने ४ जणांचे फॉर्मच भरताना चुकले. सध्या रासप ६ ठिकाणी निवडणूक लढवित असून उमेदवारी देताना मी कुठेही जातीवाद केला नसल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला आहे.
अॅड. माधवराव नाईक यांचे मी कार्य अनेक वर्षांपासून जाणत असल्याने रासपने स्वत:हून नाईक यांना मागणी न करता उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अॅड. नाईक यांना विधानसभेत पाठवा. पुढच्या खासदारकीला भाजपाकडून सुभाष वानखेडे यांना लोकसभेत पाठवायचे असल्याचे त्यांनी सांगून काँग्रेस, राकॉंने जाणीवपूर्वक धनगर समाजाला आरक्षण दिले नसल्याचा आरोप केला. परंतु भाजपाप्रणित महाआघाडीला निवडून द्या, धनगर आरक्षण झाल्याशिवाय राहणार नसल्याचे शेवटी जानकर यांनी सांगितले. (वार्ताहर)