निजामकालीन इमारतीत पोलिस ठाण्याचा कारभार
By Admin | Updated: August 13, 2014 00:22 IST2014-08-12T23:54:13+5:302014-08-13T00:22:05+5:30
मोहन बोराडे, सेलू निजामकालीन मोडकळीस आलेल्या इमारतीत पोलिस ठाण्याचा कारभार सुरू आहे.

निजामकालीन इमारतीत पोलिस ठाण्याचा कारभार
मोहन बोराडे सेलू
सेलू शहर हे उपजिल्हयाचे ठिकाण असूनही निजामकालीन मोडकळीस आलेल्या इमारतीत पोलिस ठाण्याचा कारभार सुरू आहे. नवीन इमारतीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून धुळखात पडून आहे़ दरम्यान, धोकादायक बनलेल्या इमारतीतच पोलिस कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे़
शहराच्या मध्यवस्तीत पोलिस ठाण्याची निजामकालीन जुनाट इमारत आहे़ जवळपास साठ ते सत्तर वर्षापूर्वी चुना मिश्रीत वाळूने बांधकाम केलेली ही इमारत पावसाळयात सर्वत्र गळत असल्यामुळे पोलिस ठाण्याचा कारभार करताना कर्मचाऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत.
ठाण्यात एक पोलिस निरीक्षक, एक बारानिशी, मुद्देमाल कक्ष आहेत़ तर पुरूष व स्त्री असे स्वतंत्र दोन बंदीगृह आहेत़ जुनाट झालेली इमारत पावसाळयाच्या दिवसांत गळू लागली आहे़ त्यामुळे आरोपींकडून हस्तगत झालेला मुद्देमाल व महत्वाचे दस्ताऐवज पाण्याने खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ दरवर्षी पावसाळयापूर्वी या इमारतीची डागडुजी केली जाते; मात्र ही इमारत कालबाहय झाल्यामुळे काही केले तरी या इमारतीच्या छतातून पाणी झिरपते़
पोलिस ठाण्याचा जवळपास दोन एकरचा परिसर आहे़ परंतू निजामकालीन इमारतीत सहाच खोल्या आहेत़ याच ठिकाणी पोलिस निरीक्षक कक्ष व इतर पोलिस कर्मचारी काम करतात़
बिनतारी संदेश कक्षाचे छत गळू लागल्यामुळे काही दिवसापूर्वीच दुसऱ्या खोलीत हा कक्ष स्थालांतरीत करण्यात आला आहे़
निजामकालीन इमारतीला लागूनच सहा खोल्याचे नवीन बांधकाम करण्यात आले आहे़ परंतू या खोल्या पत्र्याच्या असल्यामुळे उन्हाळयाच्या दिवसात कर्मचाऱ्यांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो़ जिल्हयातील इतर ठिकाणचे पोलिस ठाणे नवीन इमारतीत स्थलांतरीत झाले असले तरी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव अनेक वर्षापासून संबंधित विभागाकडे धुळखात पडून आहे़ नवीन इमारतीच्या बांधकामाला निधी उपलब्ध नसल्याची माहिती आहे़ तसेच अनुचित प्रकार घडल्यास आधीचे पोलिस बळ बोलविल्या जाते. अशावेळी राहण्याची व्यवस्था शहरातील मंगल कार्यालयात करण्यात येते़
अपुऱ्या खोल्या असल्यामुळे अनेक बीट जमादारांना परिसरातील झाडाखाली कामकाज करावे लागते़ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५९ गावे आहेत तर साठ पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या आहे़ तसेच ग्रामीण व शहरी भागातून पोलिस ठाण्यात येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे़
स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे अस्ताव्यस्त वाहने उभी राहतात़ तर पोलिसांच्या वाहनांना शेड नाही़ दरम्यान नवीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतीत सेलू येथील पोलिस कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे़