‘त्या’ खात्यावरील रक्कम परत करा
By Admin | Updated: October 25, 2014 23:47 IST2014-10-25T23:35:03+5:302014-10-25T23:47:51+5:30
उस्मानाबाद : विविध योजनांतर्गतचे लाभार्थी मयत असूनही त्यांच्या खात्यावर अनुदानाच्या रकमा जमा होत असल्याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच जिल्हा प्रशासनाने

‘त्या’ खात्यावरील रक्कम परत करा
उस्मानाबाद : विविध योजनांतर्गतचे लाभार्थी मयत असूनही त्यांच्या खात्यावर अनुदानाच्या रकमा जमा होत असल्याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत अशा लाभार्थ्यांच्या नावे जमा असलेले अनुदान तातडीने प्रशासनाच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँकांना दिले आहेत. तसेच गारपीटीचे अनुदान वाटप न केलेल्या बँकावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
शासनाच्या वतीने निराधारांसाठी श्रावणबाळ, संजय गांधी आदी योजना राबवून यातून त्यांचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी अनुदान दिले जाते. परंतु, संबंधितांना हे अनुदान वेळच्या वेळी मिळत नसल्याच्या तक्रारी नेहमीच ऐकावयास मिळतात. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मध्यंतरी जिल्ह्यात बँकांकडे अशा अुनदानापोटी जमा झालेल्या रकमांची तपासणी करण्यात आली. यात जिल्ह्यातील बहुतांश बँकामधून शासकीय योजनेच्या विविध लाभार्थ्यांच्या नावे प्रशासनाकडून पैसे जमा करण्यात आले असले तरी बहुतांश बँकांकडून योग्य पध्दतीने वाटप होत नसल्याचे उघड झाले होते. तसेच काही बँकांमधील या योजनेअंतर्गतचे लाभार्थी मयत असतानाही त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा असल्याचेही या पाहणीत दिसून आले.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे १२ हजार ३०१ लाभार्थी असून, त्यांना द्यावयाच्या अनुदानासाठी ३१ जुलै २०१४ पर्यंत २ कोटी ४५ लाख ४९० रूपये प्रशासनाच्या वतीने विविध बँकांत जमा करण्यात आले होते. १३ आॅक्टोबर रोजी बँकाची तपासणी केल्यानंतर तालुक्यातील ११५ मयत लाभार्थ्यांच्या खात्यावर ४ लाख ९२ हजार ६१० रूपये जमा असल्याचे उघडकीस आले.
याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिध्द केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत ही रक्कम तातडीने संबधित बँकेने प्रशासनाच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
उमरगा येथील सहाय्यक निबंधक व गटविकास अधिकारी तसेच तहसील कार्यालयाच्या वतीने उमरगा तालुक्यातील बँकाची तपासणी केली असता काही बँकांनी ग्राहकांकडून जादा सेवा शुल्क आकारणी केल्याचेही उघड झाले आहे. यात स्टेट बँक हैद्राबाद (दाळींब), बँक आॅफ महाराष्ट्र (येणेगूर), महाराष्ट्र ग्रामीण बँक (नाईचाकूर), स्टेट बँक आॅफ इंडिया (उमरगा), बँक आॅफ इंडिया (उमरगा), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (तुरोरी), स्टेट बँक आॅफ हैद्राबाद (मुरुम) या बँकानी सात टक्के पेक्षा जादा दराने व्याजाची आकारणी करून सेवा शुल्कापोटीही १ हजार ५० रूपये आकारल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौदा शाखा तसेच नाईचाकूर व आलूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा, आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या उमरगा शाखेतून गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप झाले नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
गारपिटीचे अनुदान रखडले
४तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका व उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत गारपीटग्रस्त ५४ हजार ३६६ शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानापोटी ४०५५.८१ लक्ष एवढा निधी बँकांकडे वितरित करण्यात आला होता. यातील २२७.७२ लक्ष रुपये अद्यापही वाटप झाले नसून, त्या बँकांवरही आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.