जिल्हाभरात रिपरिप
By Admin | Updated: September 8, 2014 00:05 IST2014-09-08T00:03:29+5:302014-09-08T00:05:14+5:30
परभणी: दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून रविवारी जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.

जिल्हाभरात रिपरिप
परभणी: दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून रविवारी जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.
यावर्षी पावसाने मोठा ताण दिल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. परंतु, आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती. १५ दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर मध्यंतरीचे दोन-तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली. शनिवारी रात्री पावसाचे पुनरागमन झाले. रविवारी सकाळपासूनच शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. रिमझिम स्वरुपाचा हा पाऊस रात्री ८ वाजेपर्यंत सुरु होता. मध्यम आणि रिमझिम पावसाची बरसात शहर व परिसरात होत राहिली. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. परभणी शहरासह जिल्हाभरात हा पाऊस आहे.
पूर्णा शहर व परिसरात दुपारपासूनच पाऊस सुरु होता. जवळपास १० तास रिमझिम पाऊस झाला. आजच्या पावसामुळे पूर्णा व थुना या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पूर्णा नदी दुथडी भरुन वाहत आहे. पाथरी, गंगाखेड, जिंतूर, पालम, सेलू या भागातही रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरु होता. मानवत येथे मात्र दुपारच्या सुमारास पावसाचा एक सडाका झाला. त्यानंतर पाऊस झाला नाही. (प्रतिनिधी)
येलदरी आणि परिसरात रविवारी सकाळी १० वाजेपासूनच भीजपावसाला सुरुवात झाली. दुपारनंतर या पावसाने चांगलाच जोर धरला होता. सायंकाळपर्यंत पाऊस सुरुच होता. दरम्यान, या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीवात वाढ झाली आहे. ४६ टक्के पाणीसाठा धरणात उपलब्ध झाला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसला तरी परिसरात पडणाऱ्या जोरदार पावसामुळेच पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने पावसाळ्याच्या उत्तरर्धात जोरदार हजेरी लावल्यामुळे बॅकलॉग भरुन काढण्याचे काम होत आहे.
येलदरी धरणाची पाणीसाठवण क्षमता ९३४ दलघमी आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा ३७२ दलघमी म्हणजे ४५.५० टक्के एवढा झाला आहे. भीजस्वरुपाचा हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे.