मोंढा नाक्यावरील वाहतूक कोंडी लवकर कमी करा
By Admin | Updated: September 13, 2014 00:44 IST2014-09-13T00:43:16+5:302014-09-13T00:44:53+5:30
औरंगाबाद : सध्या जालना रोडवर सुरू असलेल्या तीन उड्डाणपुलांच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़

मोंढा नाक्यावरील वाहतूक कोंडी लवकर कमी करा
औरंगाबाद : सध्या जालना रोडवर सुरू असलेल्या तीन उड्डाणपुलांच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे मोंढा नाका चौकात तासन्तास वाहतूक खोळंबत असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत़ यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकाराने विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी सकाळी ११ वा़ बैठक घेण्यात आली़
मोंढा नाका चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना बैठकीत करण्यात आल्या़ यावेळी विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती़
बैठकीत राजेंद्र दर्डा यांनी मोंढा नाका सिग्नलवर वाहतूक तासन्तास खोळंबत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले़ तसेच महत्त्वपूर्ण उपाय सुचवले़ ते म्हणाले की, बांधकामाची गती वाढली पाहिजे, रात्रपाळीत काम केल्यास ते शक्य आहे़ कामाची जागा कमी करून रोडवर लावलेले पत्रे आत घ्यावेत जेणेकरून वाहतुकीसाठी जास्त जागा उपलब्ध होईल, रोडवर ट्रक तसेच इतर वाहने थांबू देऊ नयेत, असेही त्यांनी नमूद केले़ जालना रोडवरील ताण कमी व्हावा यासाठी स्मशान मारुतीकडे जाणारा रस्ता दुरुस्त करण्याची सूचना यावेळी राजेंद्र दर्डा यांनी केली़ वाहतूक पोलिसांनी लाऊडस्पीकरवरून वाहनधारकांना सूचना दिल्यास मोंढा नाक्यावरील वाहतूक सुरळीत होऊ शकते, असेही त्यांनी सूचित केले़
विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी पैठण रोड - वाळूज लिंक रोडवरील खड्ड्े बुजविण्याचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश मनपा व सा़बा़ं विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले़ मोंढा नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दुपारी ट्रक व अवजड वाहनांना जालना रोडवरून येण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी सूचना जैस्वाल यांनी वाहतूक पोलिसांना दिली़
सिडको - बसस्टँड ते एपीआय कॉर्नर येथील उड्डाणपुलाचे काम चांगल्या प्रकारे होत असल्याचे सांगत राजेंद्र दर्डा यांनी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विद्युत डीपींकडे सर्वांचे लक्ष वेधले़ या डीपींमुळे अपघात होऊ शकतात़ त्यामुळे डीपी त्वरित हलविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना क़ेली़ त्यासोबतच वाळूज ते पैठण रोडवरील लिंक रोडमुळे होणाऱ्या वाहतुकीच्या समस्येसंदर्भात त्यांनी महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या़ स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला़
डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिकेकडून तातडीने पावले उचलण्यात यायला हवीत, असे राजेंद्र दर्डा म्हणाले़ डेंग्यूची लागण होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले़
बैठकीला पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी सैंदाणे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, सा़बां़चे कार्यकारी अभियंता एम़एम़ सिद्दीकी, सा़बां़ विभागाचे अधीक्षक अभियंता आहिरे, मनपा शहर अभियंता सखाराम पानझडे आदींसह मनपा रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन, पोलीस आदी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते़