बी-बियाणांची पूर्तता करा
By Admin | Updated: April 16, 2016 23:25 IST2016-04-16T23:17:27+5:302016-04-16T23:25:49+5:30
बीड : खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांची मुबलक उपलब्धता शेतकऱ्यांना होईल याची दक्षता संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

बी-बियाणांची पूर्तता करा
बैठक : शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना
बीड : खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांची मुबलक उपलब्धता शेतकऱ्यांना होईल याची दक्षता संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडीत, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, सीईओ नामदेव ननवरे, जिल्हा कृषी अधिक्षक रमेश भताने, कृषी उपसंचालक बी.एम. गायकवाड, महावितरणचे अधीक्षक अभियंता रतन सोनुले यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री मुंडे पुढे म्हणाल्या की, शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लागेल तेवढे बी-बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करा त्याअनुशंगाने त्याची मागणही करणे गरजेचे आहे. हंगामात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी.
बी-बियाणे, खतांचा काळाबाजार होणार नाही आणि त्यावर चोख नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके नेमण्यात यावीत. त्यामुळे काळाबाजार रोखून कार्यवाही केल्याने शेतकर्यांची गैरसोय होणार नाही.बी-बियाणाची मागणी करून त्याचा पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री मुंडे यांनी दिल्या.
जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकऱ्यांना ३१ मे पुर्वी पिककर्ज उपलब्ध करु न देणे आवश्यक आहे. मजूरांच्या हाताला काम उपलब्ध करु न देण्यासाठी नरेगाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात कामे हाती घेण्यात यावे यामध्ये शोषखड्डे, पाणंद रस्ता या कामांना प्राधान्य द्यावे असेही पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी राम यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा सादर केला. खरीपासाठी ७० हजार ८९९ क्विंटल बियाणांची मागणी आहे. विविध प्रकारच्या रासायनिक खताची २ लाख ५३ हजार ७९० मे. टन रासायनिक खताची मागणी नोंदविण्यात आली आहे. यावर्षी बँकामार्फत पिककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)
सूचना : सर्व विभागांतील अधिकाऱ्यांची हजेरी
खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यांचा पुरवठा करून पीक कर्जाविषयीही योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. बी-बियाणे विक्रीमधून दरवर्षी गैरव्यवहार होतात. त्याअनुषंगाने भरारी पथकांच्या संख्येत वाढ करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यंदा खरिपाचे क्षेत्र वाढणार असून, कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांबरोबरच कडधान्यांचीही मोठ्या प्रमाणात लागवड होणार असल्याचे प्रास्ताविकात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.