७ टक्क्यांनी वाढले रेडीरेकनरचे दर
By Admin | Updated: April 4, 2016 00:18 IST2016-04-04T00:16:23+5:302016-04-04T00:18:05+5:30
परभणी : राज्य शासनाने १ एप्रिल रोजी रेडीरेकनरच्या दरामध्ये वाढ केली आहे़ परभणी जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ७ टक्क्यांनी हे दर वाढले असल्याने सर्वसामान्य नागरिकांना घर खरेदी काहीशी महाग झाली

७ टक्क्यांनी वाढले रेडीरेकनरचे दर
परभणी : राज्य शासनाने १ एप्रिल रोजी रेडीरेकनरच्या दरामध्ये वाढ केली आहे़ परभणी जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ७ टक्क्यांनी हे दर वाढले असल्याने सर्वसामान्य नागरिकांना घर खरेदी काहीशी महाग झाली असली तरी बांधकाम दरात कपात केल्याचा दिलासाही मिळाला आहे़ जिल्ह्यात हे दर लागू झाले असून, नव्या दरानेच आता व्यवहार सुरू झाले आहेत़
जिल्ह्यातील मालमत्ता खरेदी आणि विक्रीचे व्यवहार करताना रजिस्ट्री कार्यालयातून रितसर नोंदणी करावी लागते़ शासनाने गावनिहाय जमिनीचे दर निश्चित केलेले असतात़ या दरानुसार रजिस्ट्री कार्यालयामध्ये मुद्रांक शुल्क भरून सदर जागा खरेदी केली जाते़ वाढती महागाई लक्षात घेऊन दरवर्षी रेडीरेकनरच्या दरातही वाढ केली जाते़ परंतु, यावर्षी राज्यभरात दुष्काळी परिस्थिती असल्याने रेडीरेकनरचे दर स्थिर राहतील, असे अपेक्षित होते़ मात्र राज्य शासनाने यावर्षीही साधारणत: ७ टक्क्यांपर्यंत रेडीरेकनरच्या दरात वाढ केली आहे़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम झाला आहे़ अशा परिस्थितीत शेती अथवा घर बांधकामासाठी जमीन खरेदी करताना आता शासनाला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत़ त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये रेडीरेकनरचे दर वाढल्याने आणखी एक संकट नागरिकांवर येऊन ठेपले आहे़
शासनाने रेडीरेकनरच्या दरात वाढ केली असली तरी बांधकामांच्या दरामध्ये मात्र बऱ्यापैकी कपात केली आहे़ त्यामुळे खुली जागा घेण्यापेक्षा ज्या जागेवर बांधकाम झाले आहे, अशी जागा विकत घेणे सोयीचे ठरणार आहे़ १ एप्रिलपासून जिल्ह्यात हे दर लागू झाले आहेत, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली़