भरती प्रक्रियेकडे १४१९ जणांची पाठ
By Admin | Updated: April 8, 2017 23:22 IST2017-04-08T23:21:56+5:302017-04-08T23:22:22+5:30
उस्मानाबाद : पोलीस भरती प्रक्रियेतील अर्ज दाखल केलेल्या ६१३१ पैकी १४१९ जणांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरविली़

भरती प्रक्रियेकडे १४१९ जणांची पाठ
उस्मानाबाद : येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी प्रक्रियेतून ४७१२ पैकी तब्बल ४४३२ उमेदवार पात्र ठरले आहेत़ तर २८० उमेदवार अपात्र ठरले असून, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ६१३१ पैकी १४१९ जणांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरविली़
येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर २३ मार्च पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे़ ४६ जागांसाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेत ६१३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ यात ६७५ महिला उमेदवारांचा समावेश होता़ वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पोलीस भरती प्रक्रिया पहाटेच्या सुमारास घेण्यात आली़ भरती प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी मुख्यालय मैदानाच्या आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ छायाचित्रीकरण करण्यात आले़ विशेषत: भरती प्रक्रिया सुरू असलेल्या कालावधीत मुख्यालयाच्या आवारात उमेदवारांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशबंदी करण्यात आली होती़ २३ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत पुरूष उमेदवारांची भरती प्रक्रिया घेण्यात आली़ यात अर्ज दाखल केलेल्या ५४५६ पैकी ४१९० उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी हजेरी लावली़ तर १२६६ जणांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरविली़ शारीरिक चाचणी प्रक्रियेत यातील ३९५८ उमेदवार पात्र ठरले असून, २३२ जण विविध कारणांनी अपात्र ठरले़ या भरती प्रक्रियेसाठी ६७५ महिला उमेदवारांचेही अर्ज आले होते़ यापैकी ५२२ जणींनी शारीरिक चाचणी प्रक्रियेत सहभाग नोंदविला़ तर १५३ जणींनी पोलीस भरती प्रक्रियेकडे पाठ फिरविली़ या चाचणीत ४७४ महिला उमेदवार पात्र ठरल्या असून, ४८ महिला उमेदवार अपात्र ठरल्या आहेत़ भरती प्रक्रियेतील एका तोतया विरूध्द दाखल गुन्ह्याव्यतिरिक्त ही भरती प्रक्रिया शांततेत पार पडली़