आजपासून ‘मेगा’ पोलीस भरती
By Admin | Updated: March 29, 2016 01:01 IST2016-03-29T00:09:36+5:302016-03-29T01:01:25+5:30
औरंगाबाद : शहर पोलीस, कारागृह शिपाई आणि ग्रामीण पोलीस, अशा तिन्ही दलांच्या तब्बल १८८ पदांसाठी भरती प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.

आजपासून ‘मेगा’ पोलीस भरती
औरंगाबाद : शहर पोलीस, कारागृह शिपाई आणि ग्रामीण पोलीस, अशा तिन्ही दलांच्या तब्बल १८८ पदांसाठी भरती प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. तिन्ही दलांसाठी तब्बल ३६ हजार उमेदवारी अर्ज आले आहेत. पोलीस आयुक्तालयातील मैदानावर शहर पोलीस दलाची भरती होणार आहे. ग्रामीण पोलीस दलातर्फे कारागृह शिपाई व ग्रामीण पोलिसांची भरती होणार असून पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील गोकुळ मैदानावर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शहर पोलिसांनी ८०० पोलिसांचा बंदोबस्त लावला असून ग्रामीण पोलिसांनीही ३०० पोलिसांचा फौजफाटा भरती प्रक्रियेत उतरविला आहे. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे पहाटे ५.३० पासून उमेदवारांना मैदानावर घेऊन सकाळी १० वाजेच्या आत मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. याशिवाय उर्वरित उमेदवारांची मैदानी चाचणी रात्रीच्या वेळी विजेच्या प्रकाशात घेतली जाणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस दलातर्फे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. शहर पोलीस दलातर्फे ४३ टेबल
पोलीस आयुक्तालयात होणाऱ्या ५६ जागांच्या भरती प्रक्रियेसाठी ४३ टेबल लावण्यात आले असून आयुक्त अमितेशकुमार या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. ५६ पैकी महिलांसाठी २१ तर पोलीस पाल्यांसाठी एक व गृहरक्षकासाठी दोन जागा राखीव आहेत. यासाठी तब्बल १२ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून दहा हजार पुरुष आणि दोन हजार महिलांचे अर्ज आहेत. दररोज दोन हजार उमेदवारांना बोलावण्यात आलेले आहे. ३ पोलीस उपायुक्त, ५ पोलीस सहायक आयुक्त, २९ पोलीस निरीक्षक, ६० सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक तसेच ७०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी या प्रक्रियेत सामावून घेण्यात आल्याचे उपायुक्त संदीप आटोळे यांनी सांगितले.