वीजचोरीच्या घटनांमध्ये ८८ लाखांचा दंड वसूल
By Admin | Updated: September 23, 2014 23:51 IST2014-09-23T23:48:59+5:302014-09-23T23:51:05+5:30
जालना : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांच्या काळात वीजचोरीची ८ हजार ६७८ प्रकरणे उघडकीस आली असून त्याद्वारे ८७ लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वीजचोरीच्या घटनांमध्ये ८८ लाखांचा दंड वसूल
जालना : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांच्या काळात वीजचोरीची ८ हजार ६७८ प्रकरणे उघडकीस आली असून त्याद्वारे आतापर्यंत ८७ लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जालना येथे सहा जिल्ह्यांसाठी महावितरणचे पोलिस ठाणे २००६ मध्ये स्थापन झालेले आहे. जालना, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा यात समावेश होतो. महावितरणच्या पथकांनी वीज चोरी पकडल्यानंतर संबंधितांनी दंड न भरल्यास या ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतो. २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षांच्या काळात उघडकीस आलेल्या चोरीच्या घटनांपैकी ५ हजार ३६ गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.
परिमंडळाचे मुख्य अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या विविध पथकांनी ही कारवाई केली. अनधिकृतरित्या वीज कनेक्शन घेणे, मीटरमध्ये बदल, छेडछाड करणे, विद्युत तारांवर आकडे टाकणे, क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेच्या भाराने वीज घेणे इत्यादी बाबी या पथकास आढळून आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)