बनावट भाडेपत्रकावरून घरभाडे वसूल !
By Admin | Updated: January 1, 2015 00:26 IST2015-01-01T00:18:15+5:302015-01-01T00:26:19+5:30
लातूर : जळकोट पंचायत समितीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी न राहता बनावट भाडेपत्रक जोडून घरभाडे उचलले असल्याचा आरोप आॅल इंडिया अॅन्टीकरप्शन मिशनने केला आहे.

बनावट भाडेपत्रकावरून घरभाडे वसूल !
लातूर : जळकोट पंचायत समितीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी न राहता बनावट भाडेपत्रक जोडून घरभाडे उचलले असल्याचा आरोप आॅल इंडिया अॅन्टीकरप्शन मिशनने केला आहे. याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून घरभाडे उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून परतावा करावा, अशी मागणीही आॅल इंडिया अॅन्टीकरप्शन मिशनने जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केली आहे. शिवाय, जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे.
जळकोट पंचायत समितीत कार्यरत असलेले अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. मात्र ते बनावट कागदपत्रांच्या आधारे घरभाडे उचलतात. तालुका निर्मितीपासून कित्येक कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. आतापर्यंत आठ ते दहा लाखांचे घरभाडे बनावट भाडेपत्रक जोडून उचलले आहे. या संबंधी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप चौकशी केली नाही. त्यामुळे आणखीन भाडेपत्रक लावून घरभाडे उचलणे सुरूच आहे. कारवाई न केल्यामुळे हा प्रकार सुरू आहे, असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांकडून परतावा करावा, अशी मागणीही उपोषणकर्त्यांनी सीईओंकडे केली आहे. (प्रतिनिधी)