१ कोटी २१ लाखांचा निधी वसूल करा

By Admin | Updated: January 29, 2015 01:15 IST2015-01-29T01:08:11+5:302015-01-29T01:15:35+5:30

लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेणापूर पंचायत समिती मार्फत रेणापूर, दावणगाव, रामवाडी, पानगाव, वांजरवाडी,

Recover 1 crore 21 lakh rupees | १ कोटी २१ लाखांचा निधी वसूल करा

१ कोटी २१ लाखांचा निधी वसूल करा



लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेणापूर पंचायत समिती मार्फत रेणापूर, दावणगाव, रामवाडी, पानगाव, वांजरवाडी, गरसुळी आदी गावात नाला सरळीकरणाची २३ कामे, कंम्पार्टमेंट बल्डींगची १३ कामे करण्यात आली होती़ शिवाय रेणापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत रोपवाटीकेची कामे झाली़ मात्र या कामात तफावत असून यात अफरातफर झाल्याचा आरोप बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला़ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत झालेल्या चौकशीतही ताशेरे ओढण्यात आले असून, १ कोटी २१ लाख ४४ हजार ८७६ रुपयांचा निलंबन निधी निश्चित करुनही वसूल का करण्यात आला नाही, असा सवाल सभेत उपस्थित झाला़
या कामात सहभागी असलेल्या संबंधीत अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जि़प़सदस्य अशोक पाटील निलंगेकर, हेमंत पाटील यांनी सभागृहात केली़ शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या प्रकरणी चौकशी झाली होती़ त्या चौकशीचा अहवाल दडवून का ठेवला़ संबंधीताकडून निश्चित केलेला १ कोटी २१ लाख ४४ हजार ८७६ रुपयांचा निलंबन निधी वसूल का करण्यात आला नाही, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ दरम्यान जि़प़अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी हा विषय पहिल्यांदाच सभागृहात आला आहे़ चौकशी अहवालावरुन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल़ शिवाय, निश्चित केलेला निलंबन निधीही वसूल केला जाईल़ लागलीच या कारवाईला प्रारंभ केला जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिल्यानंतर सदस्य शांत झाले़
या प्रकरणात नाला सरळीकरण कामावर ६१९१३६३ रुपये खर्च झाला. हा खर्च नियमबाह्य असून १३ कम्पार्टमेंट बल्डींगच्या कामात घोळ झाला आहे़ यातील ३७ लाख ६१ हजार ७७३ रुपये वसुलीस पात्र आहेत़ नाला सरळीकरण, रोपवाटीका व बल्डींगच्या कामात १ कोटी २१ लाख ४४ हजार ८७६ रुपयांची वसुली करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्देश देण्यात आले होते़ मात्र हे प्रकरण शासकीय यंत्रणेने दडवून ठेवले़ लोकप्रतिनिधी व सभागृहाला याची माहिती मिळू दिली नाही, असा आरोप सभागृहात झाला़ त्यावर अध्यक्षांनी प्रकरण गंभीर घेतले असून, लागलीच कारवाईला प्रारंभ केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर सभागृहातील कामकाजाला प्रारंभ झाला़
महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरु असलेल्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्र बोगस असल्याचा आरोपही सभागृहात झाला़ ही बोगस केंद्र तात्काळ बंद करावीत अथवा त्याची शहानीशा करावी, असाही प्रश्न सभागृहात उपस्थित झाला़ चंद्रकांत मद्दे, राजेसाहेब सवई, युवराज पाटील, भरत गोरे, चंदन पाटील, ज्योती पवार आदींनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले़ शिक्षण, आरोग्य, कृषि, महिला व बालकल्याण आदी विभागातील अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली़ चारा व पाणी प्रश्नांवर उपाययोजना करण्यासंदर्भातही सभागृहात चर्चा झडली़ (प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यातील जळकोट व उदगीर तालुक्यात चारा, पाण्याची बिकट स्थिती आहे़ चारा उपलब्ध नसल्याने पशुधनाला जगवावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे़ जिल्हा परिषदेने चारा छावण्या उभ्या करणे आवश्यक आहे, अशी मागणी सभागृहात सदस्यांनी केली असता, उपलब्ध चाऱ्याचा आढावा घेऊन या दोन्ही तालुक्यांसह जिल्ह्यात चारा छावण्या केल्या जातील, तसा कृती आराखडा केला जाईल, असे आश्वासन कृषि सभापती कल्याण पाटील यांनी सभागृहाला दिले़
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील एक अधिकारी पदाधिकाऱ्यांना लाखो रुपये देतो, असा आरोप चंद्रकांत मद्दे यांनी सभागृहात केला़ केलेला आरोप गंभीर असून त्याची दखल घेऊन चौकशी केली जाईल़ जर पदाधिकाऱ्यांना ‘त्या’ अधिकाऱ्याकडून कामाच्या मोबदल्यात पैसे मिळत असतील तर त्याचा पदभार काढला जाईल, असे आश्वासन सभागृहाला अध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी दिले़
४जिल्ह्यात दुष्काळ आहे़ शेतीतील कामे बंद आहेत़ त्यामुळे मजुरांना काम मिळत नाही, त्यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणीही सभागृहात झाली़

Web Title: Recover 1 crore 21 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.