फिर्यादीची माहिती करणार रेकॉर्डिंग
By Admin | Updated: June 22, 2015 00:21 IST2015-06-21T00:13:54+5:302015-06-22T00:21:14+5:30
शिरीष शिंदे , बीड प्रत्येक ठाण्यात गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीला कंट्रोल रुममधून फोन लावून ठाणे अंमलदाराच्या वर्तणूकीसह इतर माहिती गेल्या महिन्याभरापासून घेतली जात आहे.

फिर्यादीची माहिती करणार रेकॉर्डिंग
शिरीष शिंदे , बीड
प्रत्येक ठाण्यात गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीला कंट्रोल रुममधून फोन लावून ठाणे अंमलदाराच्या वर्तणूकीसह इतर माहिती गेल्या महिन्याभरापासून घेतली जात आहे. मात्र प्रत्येक ठाण्यातून फिर्यादीला वर्तनूक चांगली मिळत असल्याचा शेरा दिला जात आहे. ही बाब पोलीस अधीक्षकांना संशयास्पद वाटली. त्यामुळे आता संभाषण रेकॉर्डींगची सुविधा उपलब्ध असणारा मोबाईल कंट्रोलरुम मध्ये दिला जाणार आहे.
विश्वास नागरे पाटील यांनी औरंगाबाद परिक्षेत्र पोलीस महानिरिक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनातील पारदर्शकता वाढविण्यासाठी विविध उपाय योजना कार्यान्वीत केल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ठाण्यात गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीला कंट्रोल रुममधुन फोन लावुन ठाणे अंमलदाराच्या वर्तनुकीसह फिर्यादीची प्रत मिळाली आहे की नाही याची माहिती घेतली जाण्याच्या सुचना दिल्या आहेत. हा प्रयोग मराठवाड्यातील प्रत्येक अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रुममार्फत राबविला जात आहे.
कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एफआयआरची प्रत अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रुममध्ये दाखल केली जाते. कंट्रोल रुममधील पोलीस अधिकाऱ्यांमार्फत फिर्यादीशी संर्पक साधुन माहिती घेतली जात आहे. फिर्यादीचे नाव, गाव पत्ता, फिर्यादीची प्रत मिळाली का ?, पोलिसांनी चांगली वागणूक दिली का ?, आदी माहिती रजिस्टरवर नोंदवली जात आहे.
महिन्यारात फिर्यादीकडून घेतलेली माहिती समाधानकारक असून चांगली वर्तनुक मिळत आहे या आशयाची नोंद केली गेली. हा प्रकार अधीक्षक अनिल पारसकर यांना संशयास्पद वाटला. त्यामुळे कंट्रोल रुममधील फिर्यादीकडून माहिती घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना रेकॉर्डींगची सुविधा उपलब्ध असणारा मोबाईल दिला जाणार आहे.
अधीक्षक पारसकर किंवा उपविभागीय अधिकारी रेकॉर्डींग केलेल्या कॉलची कधीही तपासणी करतील. रजिस्टरवर असणारा चांगला असणारा शेरा व फिर्यार्दी सोबत झालेले संभाषण ऐकले जाईल. खोटी माहिती नोंद केल्यास संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होईल अशी माहिती प्राप्त झाली आहे.