अडीच वर्षांपासून रेकॉर्ड गायब !
By Admin | Updated: October 31, 2014 00:35 IST2014-10-31T00:27:53+5:302014-10-31T00:35:04+5:30
महेबूब बक्षी , भादा ‘विना सहकार, नाही उध्दार’ या तत्त्वावर चालणाऱ्या भादा येथील सोसायटीचा कारभार रामभरोसे झाला आहे़ तब्बल अडीच वर्षांपासून नव्या संचालक मंडळ व सचिवास

अडीच वर्षांपासून रेकॉर्ड गायब !
महेबूब बक्षी , भादा
‘विना सहकार, नाही उध्दार’ या तत्त्वावर चालणाऱ्या भादा येथील सोसायटीचा कारभार रामभरोसे झाला आहे़ तब्बल अडीच वर्षांपासून नव्या संचालक मंडळ व सचिवास सोसायटीचे जूने संपूर्ण रेकॉर्डच मिळाले नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे़ या सोसायटीचे रेकॉर्डच गायब झाले असतानाही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे़
औसा तालुक्यातील भादा येथील सोसायटीचा कारभार यापूर्वी जिल्ह्यात चर्चेत होता़ १३ सदस्यीय सोसायटीत सध्याच्या बँक आॅडिट प्रमाणे १५१५ सभासद असून ५ कोटींची थकबाकी असल्याची बँकेत नोंद आहे़ इ़स़ २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मागील सत्ताधारी जनार्धन पाटील यांचे पॅनेल पराभूत झाल्याने सोसायटीची सत्ता सरपंच बालाजी शिंदे यांच्याकडे गेली़ परंतु, रेकॉर्ड मात्र ९ वर्षांपासून काम पाहणारे सचिव पी़ आऱ माळी यांच्याकडेच राहिले़ नव्या संचालकांना रेकॉर्ड मात्र अद्याप मिळाले नाही़ सध्या या संस्थेतून कर्ज वाटप नोंद वही, वसूली नोंद वही, जमा पावती, खर्च पावती, किर्द नोंदी, प्रोसिडिंग बुक, नोटीस बुक, शेअर्स खतावणी, शुभमंगल योजनेचे रेकॉर्डही गायबच आहे़ रेकॉर्ड मिळवण्यासाठी संबंधित सचिवाने जिल्हा देखरेख सहकारी संस्थेकडे सतत पत्रव्यवहार केला मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याचे दिसून येते़ सध्या भादा सोसायटीत सभासद किती, कर्ज वाटप किती आणि कुणाच्या नावे कर्ज वाटप झाले याची नोंदच नाही़ सावळ्या गोंधळाच्या कारभारामुळे सभासदांना फटका बसत आहे़ सोसायटीचा कारभार पूर्वी उत्कृष्टरित्या होता़ मात्र, आता रेकॉर्डच नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे़ यास जबाबदार कोण? असा सवाल होत आहे़
आमच्याकडे रेकॉर्डच नाही, त्यामुळे आम्ही पुरेपुर माहिती सभासदांना देवू शकत नाही़ कर्ज वाटपाबाबत सोसायटीची स्थिती नाजूक आहे, असे संस्थेचे चेअरमन बालाजी शिंदे यांनी सांगितले़
४नव्या संचालक मंडळाच्या निवडीपासून भादा सोसायटीचे रेकॉर्ड अपुरेच आहे. पी़ आऱ माळी हा पूर्वीचा सचिव संस्थेचे रेकॉर्ड देत नाही़ तसे आम्ही वरिष्ठांना कळविले आहे़ त्यानुसार कार्यवाही ही झाली असल्याचे सहाय्यक निबंधक वसंत घुले यांनी सांगितले़
४मी मागील ७ महिन्यांपासून संस्थेचा कारभार पाहतो़ माझ्याकडेही रेकॉर्ड नसल्याने मला सभासद संख्या किती, कर्ज वाटपाचा आकडा किती, कोणत्या सभासदावर कर्ज काढले याबाबत मला माहिती नाही़ बँकेच्या आॅडिट प्रमाणे व बँकेतील नोंदीवरुन कर्जाचा व्यवहार पाहतो़ त्यामुळे माझाही नाईलाज झाला आहे, असे भादा सोसायटीचे सचिव जी़एस़साळुंके यांनी सांगितले़