दूध संकलनात विक्रमी घट

By Admin | Updated: October 30, 2014 00:27 IST2014-10-30T00:19:56+5:302014-10-30T00:27:18+5:30

उस्मानाबाद : सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यावरील संकटांची मालिका सुरूच आहे. मागील काही वर्षात जिल्ह्यात शीतगृहांची संख्या वाढली

Record decrease in milk compilation | दूध संकलनात विक्रमी घट

दूध संकलनात विक्रमी घट


उस्मानाबाद : सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यावरील संकटांची मालिका सुरूच आहे. मागील काही वर्षात जिल्ह्यात शीतगृहांची संख्या वाढली असली तरी दूध संकलनच कमी होत असल्याने याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. २०१०-११ मध्ये जिल्ह्यात सरासरी प्रतिदिन ५२ हजार लिटर दूध संकलन होत होते. यामध्ये मोठी घट झाली असून, मागील वर्षी जिल्ह्यात प्रतिदिन सरासरी अवघे ४४ हजार लिटर दूध संकलन झाले आहे.
मागील तीन वर्षे सातत्याने अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यातील विविध भागांना सोसावा लागत आहे. घटत्या पर्जन्यमानामुळे चाऱ्याचा प्रश्नही गंभीर असून, जनावरे जगविण्याचेच आव्हान शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने मागील वर्षी चारा छावण्यांसह इतर उपक्रम राबविले असले तरी एकूणच या परिस्थितीचा दुग्ध व्यवसायाला फटका बसल्याचेच दिसून येत आहे.
जिल्ह्यात दुग्धविकास सहकारी संस्थांची संख्या १५२४ असून याची एकूण सभासद संख्या ७७ हजार ५२० एवढी आहे. परंडा तालुक्यात ३१४ दुग्धविकास सहकारी संस्था असून, भूम ३६०, वाशी १३८, कळंब २२२, उस्मानाबाद ३०१, तुळजापूर ५२, लोहारा ५४ तर उमरगा तालुक्यात ८३ दुग्धविकास सहकारी संस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातून २०१३ मध्ये १६ हजार ३०१ लिटर एवढे दूध संकलन झाले आहे.
मात्र हे संकलन मागील वर्षीच्या तुलनेत घटल्याचे दिसून येते. २०११ मध्ये जिल्ह्यात १८ हजार ९८७ लिटर एकूण दूध संकलन झाले होते. त्या तुलनेत २०१३ मध्ये दूध संकलनात घट झाल्याने प्रतिदिन सरासरी केवळ ४४.६६ लिटर एवढेच संकलन होत असल्याचे जिल्हा दुग्धविकास विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)४
सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही सरासरीच्या अवघा ५८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसातही जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्यातील शेतकरी जोडधंदा म्हणून या दूध उत्पादनाकडे पाहत होता. मात्र जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने अनेक जण या नगदी व्यवसायापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. २०११ मध्ये जिल्ह्यातील दुग्धविकास सहकारी संस्थामधील सभासदांची संख्या ८३ हजार ३८० होती. यामध्ये ५८६० सभासदांची संख्या कमी झाली असून, २०१३ मध्ये ही संख्या आता ७७ हजार ५२० वर घसरली आहे.

Web Title: Record decrease in milk compilation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.