निधीअभावी ‘संत एकनाथ’चे पुनर्निर्माण रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:05 IST2021-06-28T04:05:56+5:302021-06-28T04:05:56+5:30

औरंगाबाद : कला, साहित्य, सांस्कृतिक चळवळीचे कधीकाळी केंद्र असलेले संत एकनाथ रंगमंदिर तीन वर्षांपासून बंद आहे. रंगमंदिराला गतवैभव ...

Reconstruction of 'Sant Eknath' stalled due to lack of funds! | निधीअभावी ‘संत एकनाथ’चे पुनर्निर्माण रखडले!

निधीअभावी ‘संत एकनाथ’चे पुनर्निर्माण रखडले!

औरंगाबाद : कला, साहित्य, सांस्कृतिक चळवळीचे कधीकाळी केंद्र असलेले संत एकनाथ रंगमंदिर तीन वर्षांपासून बंद आहे. रंगमंदिराला गतवैभव मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली विकास कामे निधी अभावी ठप्प पडली आहेत. कंत्राटदार उर्वरित कामे करण्यास स्पष्ट शब्दात नकार देत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी पालकमंत्र्यांनी ५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. मात्र, आजपर्यंत मनपाच्या पदरी निधी पडलाच नाही. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत तरी संत एकनाथ रंगमंदिराचा ‘पडदा’ झाकलेलाच राहणार आहे.

१९९१ मध्ये महापालिकेने संत एकनाथ रंगमंदिराचे लोकार्पण केले होते. अल्पावधीत नाट्य चळवळीचे हे केंद्र बनले. येथील रंगमंचाने राज्याला अनेक दर्जेदार कलावंत दिले. २०१६ पर्यंत रंगमंदिराची अतिशय बिकट अवस्था झाली. व्यावसायिक नाटक सादर करणाऱ्या कलावंतांना रंगमंचावरील खिळे अक्षरश: टोचत होते. पडदे, खुर्च्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली. शहरातील कलावंतांनी रंगमंदिराच्या या बिकट अवस्थेवर टिकेची झोड उठविली. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी रंगमंदिर २०१७ मध्ये दुरूस्तीच्या नावावर बंद केले.

रंगमंदिराच्या संपूर्ण दुरूस्तीसाठी अगोदर २ कोटी ५० लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी हळूहळू ‘सोयी’नुसार अनेक कामांमध्ये वाढ सुचविली. मनपाच्या तिजोरीत पैसा नसताना जवळपास ८ कोटींपर्यंत ही डागडुजी नेण्यात आली. यामध्ये अनेक ठिकाणी सिव्हिल वर्क, वातानुकूलीत यंत्रणा नव्याने बसविणे, खुला रंगमंच नव्याने उभारणे, प्रकाश व्यवस्था आदी अनेक कामांचा समावेश करण्यात आला. ही कामे करण्यास एकही कंत्राटदार तयार नव्हता. या कामांसाठी स्मार्ट सिटीचा निधी वापरण्यात येणार असल्याचे ‘गाजर’कंत्राटदारांना दाखविण्यात आले. त्यामुळे कंत्राटदारांनी मोठ्या उत्साहात कोट्यवधी रुपयांची कामे केली. नंतर स्मार्ट सिटीकडून या कामासाठी निधी मिळणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे कंत्राटदारांचे अवसान गळाले. मागील दीड वर्षापासून रंगमंदिराचे उर्वरित ३० टक्के काम रखडले आहे. जवळपास तीन ते चार कोटी रुपयांची कंत्राटदारांची बिले थकीत आहेत.

आणखी पाच कोटींची गरज

संत एकनाथ रंगमंदिराचे शंभर टक्के काम करण्यासाठी एकूण ५ कोटी रुपये लागणार आहेत. यापूर्वी शासनाकडून दीड कोटींचा निधी मिळाला होता. उर्वरित रकमेची महापालिका वाट पाहत आहे. रक्कम प्राप्त होताच कंत्राटदारांकडून उर्वरित कामे करून घेणे शक्य होईल.

सखाराम पानझडे, शहर अभियंता, मनपा.

Web Title: Reconstruction of 'Sant Eknath' stalled due to lack of funds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.