छत्रपती संभाजीनगर : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका खासगी भूखंडावर सुरू असलेल्या बांधकामातील निष्काळजीपणामुळे दोन चिमुकल्यांचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. २) दुपारी घडली. मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
प्राप्त माहितीनुसार, सदर भूखंडावर अंडरग्राऊंड पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू होते. हे खोदकाम इतकं खोल केलं गेलं होतं की झरे उघडे पडून सतत पाण्याचा प्रवाह सुरू राहिला. परिणामी, खोदलेल्या जागेतील खड्ड्यात खोल पाणी साचलं.
दरम्यान, आज दुपारी या परिसरात राहणारी अंदाजे तीन व पाच वर्षांची दोन चिमुकली खेळत खेळत त्या दिशेने गेली. मातीचा भराव व ओलसर कड्यावरून ते दोघं थेट पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळले. दुर्दैवाने त्या वेळी आजूबाजूला कोणीही उपस्थित नव्हतं. काही वेळाने आरडाओरड ऐकून नागरिक धावून आले आणि दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलांना तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, तोपर्यंत बराच वेळ उलटलेला होता आणि दोघांचे प्राण गेले होते.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिकांच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. इतकं मोठं खोदकाम करण्यात येत असताना सुरक्षा कुंपण, सावधानतेचे फलक अथवा मजूरांची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती.
विशेष म्हणजे, ही जागा एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या मालकीची असल्याची माहितीही पुढे येत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.