मोबाईलद्वारे तलाठ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेणार- मुथा
By Admin | Updated: July 10, 2014 01:03 IST2014-07-10T00:35:23+5:302014-07-10T01:03:02+5:30
बदनापूर :तलाठ्यांना दिलेल्या मोबाईलमध्ये एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जीपीआरएस प्रणालीद्वारे तलाठ्यांची बायोमेट्रीक हजेरी व लोकेशन घेण्यात येईल असे आश्वासन उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा यांनी दिले

मोबाईलद्वारे तलाठ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेणार- मुथा
बदनापूर :तलाठ्यांना दिलेल्या मोबाईलमध्ये एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जीपीआरएस प्रणालीद्वारे तलाठ्यांची बायोमेट्रीक हजेरी व लोकेशन घेण्यात येईल असे आश्वासन उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा यांनी दिले
बदनापूर येथे महसूल विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना मंगळवारी अँड्राईड मोबाईलचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मुथा बोलत होत्या. यावेळी त्या पुढे म्हणाल्या की शेतक-यांची सर्वात जास्त तक्रार तलाठी गावात दिसत नसल्याची असते त्यामुळे आता तलाठ्यांना दिलेल्या या मोबाईलच्या आधारे तलाठी किती वाजता कोणत्या गावात आहे हे कळण्याकरिता लवकरच एका प्रणालीची सुरूवात केली जाईल तसेच शासनाचे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी समन्वय साधून विकास साधावा असे आवाहन केले. तसेच आ. संतोष सांबरे यांनी हा उपक्रम स्तुत्य आहे. याचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी करावा आजच्या युगात मोबाईल अत्यंत आवश्यक आहे. मात्र तलाठ्यांनी हा मोबाईल नेहमी सुरू ठेवावा तसेच या कार्यालयात शुध्द पिण्याचे पाणी, संगणक आमदार निधीतून अथवा डीपीडीसी मधून देऊ असे आश्वासन दिले. तहसीलदार बालाजी सूर्यवंशी म्हणाले की, आता जग बदलले आहे. आपल्या कामकाजातही बदल होणे अपेक्षित आहे.
आता या मोबाईलच्या वापरामुळे व्हॅटस् अॅपद्वारे महसुल विभागांंतर्गतची विविध कामे नैसर्गिक आपत्ती अशा विविध घटनांची माहिती अवघ्या २ तासात आपणाला मिळेल व लोकांची कामे जलदगतीने करून त्यांना लवकर न्याय देणे अशी या योजनेमागची अपेक्षा असल्याचे सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी एस. बी. घुले, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, दलितमित्र सांडूजी कांबळे, भगवानराव कदम, अंकुशराव शिंदे, अरूण पैठणे, गोरख लांबे, अंबादास कोळसकर, सुनील बनकर, मच्छिंद्र होळकर, अ.का.दवणे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या मोबाईलचे वाटप करण्यात आले. हे मोबाईल प्रशासकीय खर्चाकरिता आलेल्या निधीतून मोफत देण्यात आले. बदनापूर तालुक्यात सर्वात प्रथम या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. यावेळी विविध योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटपही करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (वार्ताहर)