बंडखोरांची खुशामत
By Admin | Updated: April 16, 2015 00:42 IST2015-04-16T00:06:18+5:302015-04-16T00:42:14+5:30
औरंगाबाद : शिवसेना- भाजप युतीच्या विरोधात नाराजांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांची खुशामत करून त्यांनी युतीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा यासाठी स्वत: पालकमंत्री रामदास कदम प्रयत्न करणार आहेत.

बंडखोरांची खुशामत
औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीच्या विरोधात नाराजांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांची खुशामत करून त्यांनी युतीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा यासाठी स्वत: पालकमंत्री रामदास कदम प्रयत्न करणार आहेत. दोन्ही पक्षांत झालेली बंडखोरी त्यांना अपेक्षित नव्हती. त्यामुळे उद्या १६ रोजी भाजप आणि सेनेचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून बंडोबांना थंड करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सेना- भाजप युतीच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल, अशी भीती युतीला वाटू लागली आहे. बुधवारीच बैठक होणार होती; परंतु बैठकीला मुहूर्त लागला नाही.
सेनेच्या समर्थनगर येथील प्रचार कार्यालयात शिक्षक सेनेची बैठक कदम यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी पालकमंत्री कदम पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, युती झालेली आहे. सेनेचे दोन नगरसेवक बिनविरोध आलेले आहेत. बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली असून ती होणे अपेक्षित नव्हते. भाजपचे सेनेविरोधात तर सेनेचे भाजपविरोधात, अशी बंडखोरी झालेली आहे. ही बंडखोरी थांबावी, यासाठी प्रयत्न करू. युतीची लढाई एमआयएमसोबत आहे. आपसात लढून तिसऱ्याला संधी देऊ नका, असे आवाहन बंडखोरांना आहे. सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. याची जाणीव बंडखोरांनी ठेवावी. वांद्र्यात बंडखोरांचे काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे. एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्यापूर्वी आपले राजकीय शत्रू कोण हे ओळखले पाहिजे.
स्थानिक पातळीवरील नेत्यांना बंडखोरी रोखण्यात अपयश आले का, यावर कदम म्हणाले की, तसे नाही, त्यांनी त्यांच्या पातळीवर प्रयत्न केले आहेत. मनपा निवडणुकीसाठी २२ पर्यंत कदम शहरात असून ते ३० सभा युती उमेदवाराच्या वॉर्डात घेणार आहेत.