अहो आश्चर्यम़़़् जिल्ह्यातील ७०६ गर्भपाताचे कारण एकच !
By Admin | Updated: March 24, 2017 00:21 IST2017-03-24T00:16:56+5:302017-03-24T00:21:07+5:30
लातूर खाजगी दवाखान्यातील एमटीपी सेंटरमध्ये गर्भपात करण्याचे प्रमाण अधिक असून एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ या ११ महिन्याच्या कालावधीत ९९५ गर्भपात जिल्ह्यात झाले आहेत़

अहो आश्चर्यम़़़् जिल्ह्यातील ७०६ गर्भपाताचे कारण एकच !
हणमंत गायकवाड लातूर
सरकारी रुग्णालयांपेक्षा शासनमान्य खाजगी दवाखान्यातील एमटीपी सेंटरमध्ये गर्भपात करण्याचे प्रमाण अधिक असून एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ या ११ महिन्याच्या कालावधीत ९९५ गर्भपात जिल्ह्यात झाले आहेत़ त्यातील ११८ सरकारी दवाखान्यात तर ८७७ खाजगी एमटीपी सेंटरमध्ये गर्भपात केले आहेत़ खाजगी रुग्णालयात गर्भपात करून घेण्याचा आकडा अधिक कसा असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे़ वेगवेगळ्या ५ कारणांवर गर्भपात करण्यास परवानगी आहे़ मात्र लातूर जिल्ह्यात झालेल्या ९९५ पैकी ७०६ गर्भपात एकाच कारणावरून झाल्याचे निदर्शनास आल्याने यंत्रणेचा संशय बळावला आहे़ परिणामी, या सर्व गर्भपाताच्या केसेस संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या असून, आता धडक मोहिमेत त्याची तपासणी होणार आहे़
लातूर जिल्ह्यात ११६ गर्भपात केंद्र आहेत़ त्यात लातूर शहरात ७२, उदगीर १६, निलंगा ८, अहमदपूर ७, औसा ३, चाकूर २, रेणापूर १, देवणी १, जळकोट १, मुरूड २, किल्लारी १, बाभळगाव १, कासारशिरसी १, असे खाजगी व सरकारी मिळून ११६ गर्भपात केंद्र आहेत़ या गर्भपात केंद्रामध्ये अधिकृतपणे एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ या ११ महिन्याच्या कालावधीत ९९५ गर्भपात करण्यात आले़ त्यात १ ते १२ आठवड्यापर्यंतचे ८८४ आणि दोन आठवडे ते १३ आठवड्यापर्यंत १४७ गर्भपात करण्यात आले आहेत़
मातेला धोका असेल, मातेच्या शरीराला गंभीर दुखापत झाली असेल, मातेला मानसिक आजार झालेला असेल, बलात्कारामुळे गरोदरपण आले असेल आणि गर्भनिरोधक साधनांचा वापर करूनही गर्भधारणा झाली असेल या पाच कारणास्तव गर्भपात करण्याचा अधिकार आहे़ लातूर जिल्ह्यात झालेले बहुतांश गर्भपात गर्भनिरोधक साधनांचा वापर करून गर्भधारणा झाल्यामुळे केले आहेत़ ९९५ पैकी ७०६ गर्भपात याच कारणास्तव झाले आहेत़