रिअल इस्टेट सावरता सावरेना !
By Admin | Updated: February 7, 2017 22:26 IST2017-02-07T22:21:49+5:302017-02-07T22:26:07+5:30
लातूर नोटाबंदीचा निर्णय होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी रिअल इस्टेटचा व्यवहार अद्यापी सावरला नाही़

रिअल इस्टेट सावरता सावरेना !
राजकुमार जोंधळे लातूर
नोटाबंदीचा निर्णय होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी रिअल इस्टेटचा व्यवहार अद्यापी सावरला नाही़ प्लॉट, फ्लॅट, शेतीच्या खरेदी-विक्रीचे नोटाबंदीपूर्वी साडेपाच हजारांवर खरेदी विक्रीचे व्यवहार महिन्याकाठी होत असत़ मात्र सध्या दोन हजाराच्या आसपासही व्यवहार होत नसल्याने शासनाचा महिन्याकाठी सरासरी १० ते १२ कोटी मिळणाऱ्या महसुलात घट झाली आहे़ सध्या महिन्याला खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून पाच कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जात आहे़ एवढी मोठी घट लातूरच्या रिअल इस्टेटच्या व्यवहारात झाली आहे़
८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला़ या निर्णयाला आज ८ फेब्रुवारी रोजी तीन महिने पूर्ण होत आहेत़ या तीन महिन्यात नोटाबंदीच्या निर्णयाने रिअल इस्टेट क्षेत्रातील खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्णत: कोलमडला आहे़ तीन महिन्यानंतरही तीन महिन्यानंतरही रिअल इस्टेटचे व्यवहार सावरता सावरत नाहीत़ एकंदरीत ६० टक्क्यांनी हे व्यवहार घसरले असून, शासनाच्या महसुलातही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे़
लातूर शहरासह जिल्हाभरात प्लॉट, शेतजमीन, रो-हाऊस, बंगलोज् आणि फ्लॅटचे व्यवहार जोमात होते़ मात्र या व्यवहाराला नोटाबंदीच्या निर्णयाने ग्रहण लागले़ या क्षेत्रात आता मंदीची लाट आली आहे़