सुट्यांसाठी शहरवासीय झाले सज्ज
By Admin | Updated: December 23, 2015 00:09 IST2015-12-22T23:18:35+5:302015-12-23T00:09:51+5:30
औरंगाबाद : नाताळ सण, वीकेंड आणि त्यानंतर सरत्या वर्षाला निरोप, असा तिहेरी योग जल्लोषात साजरा करण्यासाठी औरंगाबादकर सज्ज झाले आहेत.

सुट्यांसाठी शहरवासीय झाले सज्ज
औरंगाबाद : नाताळ सण, वीकेंड आणि त्यानंतर सरत्या वर्षाला निरोप, असा तिहेरी योग जल्लोषात साजरा करण्यासाठी औरंगाबादकर सज्ज झाले आहेत. नाताळ सणाच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मित्र, परिवारासह विविध पर्यटनस्थळ गाठण्याकडे अनेकांचा कल असून, त्या दृष्टीने जोरदार तयारी क रण्यात आली आहे. परिणामी, विविध मार्गांवरील रेल्वेगाड्या आणि विमानांचे आरक्षण फुल होत आहे.
अनेकांनी काही महिन्यांपूर्वीच रेल्वे, विमानांचे आरक्षण केले. औरंगाबादहून विमानसेवेने दिल्ली, मुंबई गाठून त्यापुढे पर्यटनस्थळांकडे जाण्यास प्राधान्य देण्यात आला आहे, तर सर्वसामान्यांनी सुट्यांचा आनंद कुटुंबासोबत घेण्यासाठी पर्यटनाला जाण्यासाठी रेल्वेगाड्यांचा आधार घेतला आहे. शिवाय तिरुपतीसह विविध धार्मिक पर्यटन करण्याचेही नियोजन करण्यात आले. तिरुपतीला जाण्यासाठी रेल्वेगाड्यांबरोबर याच वर्षी सुरू झालेल्या विमानसेवेचा आधार घेतला जात आहे.
गोवा बनले समीकरण
नाताळ सण आणि नववर्ष म्हटले की, गोवा असेच समीकरण गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. त्यामुळे गोव्याला जाण्यास अनेकांकडून प्राधान्य दिले जात आहे; परंतु प्रत्येक वर्षी गोव्यासाठी विशेष रेल्वेची नुसती प्रतीक्षा करण्याची वेळ असल्याने खाजगी वाहतूक सुविधांचा आधार घेण्याची वेळ शहरवासीयांवर येत आहे.
या ठिकाणांकडेही कल
केरळ, म्हैसूर, उटी, लोणावळा, महाबळेश्वर, लवासा ही ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. त्या तुलनेत यंदा विदेशवारीकडे कल कमी असल्याचे पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. यातही दुबई, थायलंड, सिंगापूर या ठिकाणी जाण्यास अनेकांचे प्राधान्य आहे. किमान ५ ते १० हजार शहरवासीय पर्यटनासाठी जातील, असे टुरिझम प्रमोटर्स गील्ड औरंगाबादचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी सांगितले.