आयोगाची पुन्हा बेपर्वाई

By Admin | Updated: June 30, 2014 01:05 IST2014-06-30T00:54:34+5:302014-06-30T01:05:57+5:30

औरंगाबाद : मतदार नोंदणीसाठी विशेष नोंदणी मोहीम जाहीर करूनही आयोगाने पुरेशा अर्जांचा पुरवठा न केल्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागला.

Reaction of the Commission | आयोगाची पुन्हा बेपर्वाई

आयोगाची पुन्हा बेपर्वाई

औरंगाबाद : मतदार नोंदणीसाठी विशेष नोंदणी मोहीम जाहीर करूनही आयोगाने पुरेशा अर्जांचा पुरवठा न केल्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागला. शहरातील बहुसंख्य केंद्रांवर आजही नोंदणी तसेच दुरुस्ती आणि स्थलांतराचे अर्जच उपलब्ध नव्हते. त्यामुळे मतदान केंद्रांच्या ठिकाणी आलेल्या लोकांना नोंदणीविनाच परत जावे लागले. तर काही ठिकाणी झेरॉक्स सेंटरवरून अर्जांची विक्री केली जात होती.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवरही नोंदणी अर्ज वाटप आणि स्वीकारण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी दिवसभर केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहणार होते. मात्र, शनिवारी बहुसंख्य केंद्रांवर बीएलओ पोहोचलेच नाही. तसेच अनेक ठिकाणी नोंदणी अर्जच उपलब्ध नव्हते. त्यामुळे नागरिकांना नोंदणी करता आली नव्हती. रविवार असल्यामुळे नाव नोंदणीसाठी आज ठिकठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने केंद्रांवर पोहोचले. मात्र, आजही अर्जांचा तुटवडा कायम होता. गारखेडा भागातील कडा कार्यालय, सिल्लेखाना येथील देवगिरी विद्यालय, मिलकॉर्नर, समता कॉलनी, सातारा परिसरातील अय्यप्पा मंदिर, जवाहर कॉलनी, मध्यवर्ती बसस्थानकाजवळील कामगार कल्याण कार्यालय आदी ठिकाणी भेटी दिल्या असता तेथे दुरुस्ती आणि स्थलांतराचे अर्ज उपलब्ध नव्हते. तसेच यातील काही ठिकाणी नवीन नाव नोंदणीचे अर्जही संपले होते. कडा कार्यालयाच्या केंद्रांवर तर नोंदणीसाठी आलेल्यांना शेजारच्या झेरॉक्स सेंटरवर अर्ज उपलब्ध असल्याचे सांगितले जात होते. तेथे या अर्जांची दहा रुपयांस विक्री केली जात होती. अयप्पा मंदिराजवळील केंद्रावरही नागरिकांना अर्जांच्या झेरॉक्स आणण्यास सांगितले जात होते. जिल्हा प्रशासनाने पुरेसे अर्जच दिले नसल्याचे बीएलओंनी सांगितले. परिणामी येत्या निवडणुकीत अनेकांना नोंदणीअभावी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
...तरीही १६ केंद्रांवर बीएलओ गैरहजर
विशेष मतदार नोंदणी मोहिमेत आजही काही बीएलओ गैरहजर होते. तहसील कार्यालयाच्या अहवालानुसार रविवारी शहरातील १६ ठिकाणी बीएलओ पोहोचले नव्हते. तसेच शनिवारी १९ मतदान केंद्रांवर बीएलओ गेलेच नव्हते. या सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार विजय राऊत यांनी सांगितले.
शहरात ३५ हजार अर्जांचे वितरण
शहरातील अनेक केंद्रांवर नागरिकांना नोंदणी अर्ज मिळाले नसले तरी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी मात्र अर्जांचा तुटवडाच नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, विशेष मतदार नोंदणी मोहिमेसाठी शहरात नवीन नावनोंदणीचे ३५ हजार अर्ज वितरित केले होते. याशिवाय नावातील दुरुस्तीचे ७ हजार आणि स्थलांतराचे ७ हजार अर्ज बीएलओंकडे दिले होते. कुठे तुटवडा निर्माण झाला असेल किंवा झेरॉक्स करून आणायला सांगितले गेले असेल तर त्याविषयी तपासून बघावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
गैरहजर बीएलओंवर कारवाई होणार
दोन दिवसांच्या विशेष मोहिमेदरम्यान एकूण ३५ केंद्रांवरील बीएलओ गैरहजर आढळले. या कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली असून या सर्वांचा अहवाल सोमवारी तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्वांवर लगेच कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केंद्रांना अचानक भेटी
शनिवारी काही केंद्रांवर बीएलओ पोहोचलेच नसल्याचे लोकमतने आज प्रसिद्ध केले. त्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, तहसीलदार विजय राऊत यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी आज वेगवेगळ्या केंद्रांना अचानक भेट दिली.

Web Title: Reaction of the Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.