अपंगांच्या आयुष्याला आशेचा किरण...
By Admin | Updated: March 20, 2017 23:42 IST2017-03-20T23:41:39+5:302017-03-20T23:42:27+5:30
लातूर : लोकमत, साधू वासवानी मिशन, पुणे आणि श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कृत्रिम हात-पाय वितरण मोफत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अपंगांच्या आयुष्याला आशेचा किरण...
लातूर : लोकमत, साधू वासवानी मिशन, पुणे आणि श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कृत्रिम हात-पाय वितरण मोफत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अपंगांना ‘आशेचा किरण’ या शिबिरातून मिळाला. २७५ अपंगांनी या शिबिरासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १९२ रुग्णांनी प्रत्यक्ष हजर राहून तपासणी करून घेतली.
अपघाताने जीवनात आलेल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी अपंगांना लोकमत, साधू वासवानी ट्रस्ट आणि श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेने मदतीचा हात पुढे केला. रविवारी ‘अरोमा’च्या सभागृहात कृत्रिम हात-पाय बसविण्यासाठी शिबीर घेतले. या शिबिरात १९२ अपंगांनी हात-पायांचे माप दिले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद द्विगुणित झाला होता. शिबिराचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, काँग्रेसचे नेते शैलेश पाटील चाकूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी साधू वासवानी मिशनचे डॉ. सलील जैन, मिलिंद जाधव, श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक अजय ठक्कर, ‘लोकमत’चे शाखा व्यवस्थापक नितीन खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. अपंगांच्या चेहऱ्यांवर आलेले नैराश्य ‘लोकमत’च्या या उपक्रमामुळे दूर होणार आहे. या अपंगांना जगण्याची उमेद आणि बळ मिळाले आहे. सामाजिक बांधिलकी पत्करून ‘लोकमत’ नेहमीच असे उपक्रम हाती घेते. अशा उपक्रमांत पोलीस दलही सहभागी होईल. ‘लोकमत’ने हाक द्यावी, त्यात आमचाही खारीचा वाटा असेल, असे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड म्हणाले.