रेशनच्या तूरडाळीला महागाईचा तडका !

By Admin | Updated: October 12, 2016 23:25 IST2016-10-12T23:21:44+5:302016-10-12T23:25:00+5:30

बाळासाहेब जाधव लातूर जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानात येणाऱ्या तूरडाळीचा भाव १०३ रुपये किलोवर गेला आहे.

Rashtrapati taladala tadka inflation! | रेशनच्या तूरडाळीला महागाईचा तडका !

रेशनच्या तूरडाळीला महागाईचा तडका !

बाळासाहेब जाधव लातूर
जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानात येणाऱ्या तूरडाळीचा भाव १०३ रुपये किलोवर गेला आहे. तर त्याच डाळीचा बाजारातील भाव ८० रुपये किलो आहे. बाजार भावापेक्षा स्वस्त धान्य दुकानातील तूरडाळ प्रति किलो २३ रुपयांनी महाग आहे. त्यामुळे तूरडाळीसाठी स्वस्त धान्य दुकानांकडे कार्डधारकांनी पाठ फिरविली आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात रेशनच्या धान्यांचा कोटाच जिल्ह्याला मिळाला नसल्याने रेशन दुकानदार चिंतेत आहेत.
लातूर जिल्ह्यातील बीपीएलच्या ८६ हजार २२४, अन्त्योदयच्या ४१ हजार १६२, केशरी शिधापत्रिकाधारक ३ लाख २६ हजार ५०४, तर अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांची संख्या १८३२ तर शुभ्र शिधापत्रिकाधारकांची संख्या १८ हजार ४९२ अशा एकूण ४ लाख ७४ हजार ८१४ एवढी संख्या शिधापत्रिकाधारकांची आहे. एकूण शिधापत्रिकाधारकांपैकी १ लाख २८ हजार नागरिक अन्त्योदय व बीपीएलचे लाभधारक आहेत. या लाभधारकांसाठी तूरडाळीचा १२८० क्विंटलचा स्टॉक आॅगस्टमध्ये आला. परंतु, स्वस्त धान्य दुकानातील तूरडाळीचा भाव १०३ रुपये प्रति किलो तर बाजारातील तूरडाळीचा भाव ८० रुपये किलो आहे. या दोन्ही भावामध्ये २३ रुपयांची तफावत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्याने बहुतांश तूरडाळ स्वस्तधान्य दुकानदारांकडे पडून राहिली. तर बाजारातील तूरडाळ २३ रुपये कमी दराने मिळत असल्याने बाजारातील तूरडाळीला प्राधान्य दिले असल्याने १३५० स्वस्तधान्य दुकानांतील तूरडाळ दुकानातच पडून राहिली. याबाबत पुरवठा विभागाने नागरिकांच्या तक्रारींबाबत शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु, स्वस्त धान्य दुकानातील तूरडाळीच्या दराबाबत कुठलेही लेखी पत्र शासनाकडून अद्यापपर्यंत आले नसल्याने पुरवठा विभागानेही तूरडाळीची नंतर मागणीच केली नाही. परिणामी, स्वस्त धान्यातून मिळणाऱ्या डाळीला महागाईची किनार मिळाल्याने नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानातील डाळींकडे पाठ फिरविली आहे.

Web Title: Rashtrapati taladala tadka inflation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.