राष्ट्रसंतांनी राष्ट्रभक्तीचा पाया रचला

By Admin | Updated: April 4, 2016 00:11 IST2016-04-04T00:10:55+5:302016-04-04T00:11:29+5:30

नांदेड : देशात दररोज वाईट बातम्या ऐकायला येत आहेत़ त्यामुळे मनात अशी भीती निर्माण होत आहे की सर्वच वाईट चाललंय़ त्यामुळे भवितव्याबाबत चिंता वाटत आहे़

Rashtra Sans formed the foundations of patriotism | राष्ट्रसंतांनी राष्ट्रभक्तीचा पाया रचला

राष्ट्रसंतांनी राष्ट्रभक्तीचा पाया रचला

नांदेड : देशात दररोज वाईट बातम्या ऐकायला येत आहेत़ त्यामुळे मनात अशी भीती निर्माण होत आहे की सर्वच वाईट चाललंय़ त्यामुळे भवितव्याबाबत चिंता वाटत आहे़ असे असताना दुसरी बाजू चांगलीही आहे़ जे काही चांगले घडत आहे ते संतांच्या विचारसरणीमुळे़ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तर राष्ट्रभक्तीचा पाया रचला आहे़ त्यांच्या विचारापासून प्रेरणा घेवून भावी पिढीमध्ये त्यांचे विचार रुजविण्याचे काम तुम्हा-आम्हा सर्वांना करावयाचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनात चव्हाण बोलत होते़ ते म्हणाले, त्या काळातील महाराजांच्या कार्याची आजच्या तरुण पिढीला माहिती नाही़ मी मुख्यमंत्री असताना, कुलगुरु पठाण यांनी माझ्याकडे महाराजांच्या नावे अध्यासन केंद्र सुरु करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती़ त्यानंतर आठ दिवसांत ते पैसे अध्यासन केंद्राला मिळाले़ तरुण पिढीवर राष्ट्रसंतांच्या विचारांचे संस्कार झाले पाहिजे़ त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली पाहिजे़ त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम आम्ही करीत आहोत़ मला इथे राजकारण करावयाचे नाही़, परंतु देश एकसंघ राहिला पाहिजे, वाद-तंटे निर्माण होणार नाहीत, यासाठी सर्वांनी सावध राहिले पाहिजे़ त्यासाठी संस्कार महत्वाचे असतात़ शंकररावांनी केलेल्या संस्कारामुळे आमचा पाया मजबूत झाला आहे़ तीच शिकवण घेवून आमची पुढची पिढी कार्यरत आहे़ देशात सध्या अनेक प्रश्न आहेत़ राज्यात साडेतीन हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत़ दु:खी भावनेने ही मंडळी ग्रासली होती़ त्यामुळे त्यांनी जीवनयात्रा संपविली़ ही चिंंतेची बाब आहे़ त्याचबरोबर पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे़ पाण्याच्या टँकरसाठी पोलिस बंदोबस्त लावावा लागत आहे़ परंतु त्याचबरोबर समाजात काही चांगल्या गोष्टीही घडत आहेत़ त्याला संतांची विचारसरणी कारणीभूत आहे, असेही खा़ चव्हाण म्हणाले़
अध्यक्षस्थानावरुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ़ एस़ एऩ पठाण म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे या अभंगातून व्यक्त होणारा मानवता धर्म सर्व जगापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या सर्वांना आता पुढाकार घ्यायचा आहे़ अशा या श्रेष्ठ अभंगालाच मी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे गीत म्हणून निश्चित केले़ या अभंगाचे दिवगंत विलासराव देशमुख यांनीही कौतुक केले आहे़ विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनशिक्षण अभियानाद्वारे २०० अभ्यासक्रम तयार केले़ राष्ट्रसंत हे केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते़ काही लोक स्वत:ला आध्यात्मिक गुरु म्हणून मिरवत असतात़ राष्ट्रसंतांनी सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानला़ ते विज्ञाननिष्ठ ग्रामसुधारक होते़ त्यासाठीच त्यांनी ग्रामगीता लिहिली़ सध्या समाजाच्या नावावर दुही पसरविण्याचे काम केले जात आहे़ हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावली जात आहेत़ त्यामुळे आजघडीला राष्ट्रसंतांच्या विचारांची नितांत गरज आहे़ राष्ट्रसंतांनी या दोन्ही समाजात एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला़ शासनाने सुरु केलेल्या स्किल इंडिया या योजनेचे देशपातळीवर राष्ट्रसंत तुकडोजी कौशल्य विकास अभियान असे नामकरण करावे, अशी मागणीही पठाण यांनी केली़ आ़ डी़ पी़ सावंत, महापौर शैलजा स्वामी, जनार्दन बोथे, डॉ़ रघुनाथ वाडेकर, किशोर स्वामी, माधवराव पाटील झरीकर यांची उपस्थिती होती़ दरम्यान, कार्यक्रमस्थळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जीवनपट उलगडणारी छायाचित्रांची प्रदर्शनी भरविण्यात आली होती़ त्यातील ऐतिहासिक चित्रे लक्ष वेधून घेत होती़ (प्रतिनिधी)
आठ दिवसांत अध्यासन केंद्राला निधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ़पठाण म्हणाले, प्रतिभा पाटील राष्ट्रपती असताना नागपूरला आल्या होत्या़ त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अशोकराव चव्हाण हेही तिथे उपस्थित होते़ अशोकरावांना मी तुकडोजी महाराजांच्या नावे अध्यासन केंद्रासाठी दोन कोटी रुपये निधी लागणार असल्याचे सांगितले होते़ त्यानंतर कार्यक्रमात अशोकरावांनी दोन कोटींचा निधी पंधरा दिवसांत मिळणार, असे आश्वासन दिले होते़ परंतु अवघ्या आठच दिवसांत तो निधी अध्यासन केंद्रासाठी मिळाला़ त्यामुळे त्याबद्दल अशोकरावांचे आभार मानत असल्याची भावनाही पठाण यांनी व्यक्त केली़

Web Title: Rashtra Sans formed the foundations of patriotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.