सिल्लोड शहरालगत आढळली अतिदुर्मिळ ‘उडी चिरायत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST2020-12-17T04:32:42+5:302020-12-17T04:32:42+5:30

श्यामकुमार पुरे सिल्लोड : शहरालगत अत्यंत दुर्मिळ पुष्पाैषधी ‘उडी चिरायत’ आढळली असून तेथे हरित फलक लावून अभिनव प्रतिष्ठानने सामाजिक ...

Rare 'Udi Chiraat' found near Sillod | सिल्लोड शहरालगत आढळली अतिदुर्मिळ ‘उडी चिरायत’

सिल्लोड शहरालगत आढळली अतिदुर्मिळ ‘उडी चिरायत’

श्यामकुमार पुरे

सिल्लोड : शहरालगत अत्यंत दुर्मिळ पुष्पाैषधी ‘उडी चिरायत’ आढळली असून तेथे हरित फलक लावून अभिनव प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली आहे. पश्चिम घाटात आढळणारी ही औषधी आयुर्वेदात खूप महत्वाची व शक्तीवर्धक मानली जाते.

दीपक सुर्वे यांना नुकतेच सिल्लोड रजाळवाडी कडून येणाऱ्या नाल्याच्या शेतावरील बांधाजवळ कधीही न दिसणारी आकर्षक जांभळ्या फुलांची झुपकेदार वनस्पतीचे तीन झुडपे आढळली. त्यांनी त्वरित सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे डॉ. संतोष पाटील यांना फोनवरून माहिती दिली.

डॉ. पाटील यांनी भेट देऊन या जांभळ्या आकर्षक फुले असलेल्या वनस्पतीचे निरीक्षण केले. अत्यंत दुर्मिळ झालेली आपल्याकडे कधी न आढळणारी ‘उडी चिरायत’ दुर्मिळ असल्याने त्यांनी संबंधित शेतकऱ्यास त्या झाडाच्या सुकलेल्या फुलांचे संकलन करण्याची माहिती दिली. या ठिकाणी पर्यावरणाशी बांधिलकी म्हणून व निसर्गप्रेमींना माहिती दिली. अभिनव प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष-किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे ‘हरित फलक’ लावण्यात आला. राजाळवाडी जवळील तलावाच्या परिसरात मोठी जैवविविधता आहे. या ठिकाणी गत महिन्यात चार स्पूनबील पक्षीपण आढळले होते.

पश्चिम घाटात आढळते ही पुष्पौषधी

महाराष्ट्रात पश्चिम घाटात आढळते. आपल्या भागात हिची प्रथमच नोंद झाली आहे. हिचे शास्त्रीय नाव एक्झाकम बायकलर असे असून ही मूळ भारतीय बहुउपयोगी आहे. कोकणात हिस वाघनक्षी म्हणून ओळखले जाते.

-------

आयुर्वेदात या वनस्पतीचे महत्व

सुमारे तीन फूट उंचीचे ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात गर्द जांभळी आकर्षक फुले येणारी ही वनस्पती आयुर्वेदात गुणाणे तीक्त, कडू, ज्वरनाशक, शक्तिवर्धक, यकृत विकारांवर प्रभावी, तसेच संधिवातावर उपयुक्त ठरणारी वनस्पती आहे. याचे परागीभवन अर्जिनिस तथा फ्रिटीलरी प्रजातींच्या फुलपाखरांच्याद्वारे होते. अनेक फुलपाखरे, मधमाश्या, भुंगे या सुंदर फुलांचा पराग चाखण्यासाठी या झुडपावर अधिवास करतात. जांभळ्या रंगाचे एरवी कीटकांना नेहमीच आकर्षित असते. या वनस्पतीचे बी इथे पक्षांच्या माध्यमातून आले असावे. सुकलेल्या फुलांचे व त्यातील बियांचे व्यवस्थित संकलन करून संवर्धन करण्यात येणार आहे. - डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड

फोटो

सिल्लोड शहरालगत आढळली अति दुर्मिळ पुष्पौषधी ‘उडी चिरायत’

Web Title: Rare 'Udi Chiraat' found near Sillod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.