छत्रपती संभाजीनगर : एक १५ वर्षीय मुलगी गेल्या काही महिन्यांपासून स्वतःचे केस उपटून ते गिळत असल्याचे निदर्शनास आले. यातून तिच्या पोटात तब्बल ३ सेंटीमीटरचा केसांचा गोळा आढळून आला आहे. ‘ट्राइकोफेगिया/ट्रायकोटेलोफिगा’ या मानसिक विकारामुळे असा प्रकार घडल्याचे मनोविकारतज्ज्ञांनी स्पष्ट केले.
एका खासगी रुग्णालयात या मुलीवर मानसिक आजाराचे उपचार सुरू आहेत. या मुलीच्या डोक्यावर जवळपास २५ टक्के टक्कल पडले होते. तिला मानसिक आजार असल्याचे निदान झाले. ती केवळ केस उपटत असल्याची शंका होती. यानुसार गेल्या सहा महिन्यांपासून तिच्यावर औषधोपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी तिचे पोट फुगले. त्यामुळे कुटुंबाने तिला रुग्णालयात नेले. सीटी स्कॅन तपासणीनंतर तिच्या पोटात केसांचा गोळा असल्याचे समोर आले. यातूनच ट्राइकोफेगिया/ ट्रायकोटेलोफिगा हा मानसिक विकार जडल्याचे लक्षात आले.
काय आहेत लक्षणे?ट्राइकोफेगिया/ ट्रायकोटेलोफिगा ही एक मानसिक स्थिती आहे, ज्यामध्ये व्यक्ती आपले केस तोडून ते चघळते किंवा गिळते. याची लक्षणे म्हणजे स्वतःचे केस उपटल्यावर ते तोंडात घेणे, चघळणे किंवा गिळणे, पोटात केसांचा गोळा तयार होणे, पोटदुखी, मळमळ, उलटी होणे, बद्धकोष्ठता यासारखी पचनतंत्राची लक्षणे आढळतात. लहान मुली किंवा किशोरवयीन मुलींमध्ये हे अधिक आढळते.
कारणे...- चिंता, तणाव, नैसर्गिक अस्वस्थता.- ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरशी संबंधित वर्तन.- बालपणीचे मानसिक आघात.- दुर्लक्ष किंवा आत्मसन्मानाचा अभाव.
हा मानसिक आजार‘ट्रायकोटेलोमिनिया’त रुग्ण केवळ केस उपटतो, तर ‘ट्रायकोटेलोफिगा’मध्ये रुग्ण केस उपटून खातो. हा एक मानसिक आजार असून, तो दुर्मीळ मानला जातो. त्या मुलीवर औषधोपचार सुरू आहेत. केसांचा गोळा छोटा असल्याने शस्त्रक्रियेऐवजी इंडोस्कोपीने पोटातील केसांचा गोळा काढण्यात येणार आहे.- डाॅ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ