फाटाफुटीने वाढले ३५ उमेदवार
By Admin | Updated: October 3, 2014 23:53 IST2014-10-03T23:53:11+5:302014-10-03T23:53:11+5:30
२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७४ उमेदवार आखाड्यात होते.

फाटाफुटीने वाढले ३५ उमेदवार
२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७४ उमेदवार आखाड्यात होते. ६ जागांसाठी हा सामना चांगलाच रंगला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस तसेच भाजप व सेना एकत्रित निवडणुका लढले होते. गतवेळी शिवसेनेने बीडची एकमेव तर काँग्रेसने परळीची एकमेव जागा लढली होती. उर्वरित ५ ठिकाणी राष्ट्रवादीविरुद्ध भाजपा अशी थेट लढाई झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीने भाजपाला सुरुंग लावला होता. ६ पैकी ५ जागा पटकावत राष्ट्रवादीने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली होती. भाजपाला परळीच्या एकमेव जागेवर समाधान मानावे लागले होते.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव यांच्या निधनानंतर प्रथमच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची चांगलीच कसोटी लागली आहे. सलग तीन ‘टर्म’ एकत्रित संसार केलेल्या आघाडीत फाटाफूट झाल्यामुळे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचेही समीकरण बदलून गेले.
एरव्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ‘हात’भार लावत पडती बाजू घेणाऱ्या काँग्रेसनेही यावेळी सर्वच्या सर्व ६ ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे केले. दुसरीकडे शिवसेनेने देखील परळी वगळता सर्व ठिकाणी आपल्या उमेदवारांना आखाड्यात उतरविले. आता मागच्या सारखी ‘स्ट्रेट फाईट’ नाही. लढती बहुरंगी आहेत.
२००४ मध्ये ६ जागांसाठी ७६ उमेदवार उभे होते. २००९ मध्ये हा आकडा २ ने कमी झाला. यावेळी मात्र उमेदवारांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. ६ जागांसाठी १०९ उमेदवार नशीब अजमावत आहेत. गतवर्षीपेक्षा ३५ उमेदवारांची गर्दी यावेळी वाढली आहे.
६ जागांसाठी तब्बल २०७ अर्ज वैध ठरले होते. मात्र ९८ जणांनी माघार घेतली. त्यामुळे १०९ उमेदवार रिंगणात आहेत. अपक्षांनीही यंदा चांगलीच गर्दी केली आहे. गेवराईमध्ये सर्वात कमी ११ उमेदवार आहेत तर बीडमध्ये सर्वाधिक २५ उमेदवार आहेत. पाठोपाठ आष्टी येथे १२ तर माजलगावात २४ उमेदवारांमध्ये सामना रंगला आहे. मतांचे विभाजन होणार असल्यामुळे धक्कादायक निकालाची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. तूर्त प्रचाराला मोठा वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. ठिकठिकाणी मातब्बर नेत्यांच्या सभा, बैठकांची रेलचेल सुरू आहे.
लोकसभेत ‘स्ट्रेट फाईट’
बीड लोकसभेसाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत १२ उमेदवार आमने-सामने आहेत. मात्र खरी लढत भाजपच्या उमेदवार प्रीतम गोपीनाथ मुंडे, काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील यांच्यात होत आहे. अशोक पाटील यांनी यापूर्वी दोनदा लोकसभा निवडणूक लढविली. मात्र त्यांना अपयश आलेले आहे. दुसरीकडे प्रीतम मुंडे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे.