साथरोगाच्या नियंत्रणासाठी ‘रॅपीड फोर्स टीम’ तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:07 IST2016-07-10T00:51:07+5:302016-07-10T01:07:49+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात साथरोगाच्या नियंत्रणासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘रॅपीड फोर्स टीम’ तैनात करण्यात आली आहे.

साथरोगाच्या नियंत्रणासाठी ‘रॅपीड फोर्स टीम’ तैनात
औरंगाबाद : जिल्ह्यात साथरोगाच्या नियंत्रणासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘रॅपीड फोर्स टीम’ तैनात करण्यात आली आहे. सध्या दोन-तीन ठिकाणी जवळपास १०० जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असली तरी बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली.
पावसाळ्यात साथरोगाचा फैलाव झपाट्याने होत असतो, हे गृहीत धरून प्रशासनाने जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘रॅपीड फोर्स टीम’ तैनात करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिकांचा समावेश आहे. याशिवाय आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा मुबलक साठा (मेडिसीन कीट) ठेवण्यात आलेला आहे. गेल्या तीन दिवसांत सोयगाव तालुक्यातील ठाणा या गावामध्ये जवळपास शंभराहून अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली. ही घटना समजताच नजीकच्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांतील ‘रॅपीड फोर्स टीम’ रात्रीतूनच ठाणा गावाकडे रवाना झाल्या. त्या गावातील जि.प. शाळांमध्ये तात्काळ कॅम्प सुरू केला असून तेथेच बाधित रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. रुग्णांवर औषधोपचार केल्यानंतर जरंडी व सोयगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जवळपास २० ते ३० अत्यवस्थ रुग्णांना हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आल्याचे डॉ. खतगावकर यांनी सांगितले.
गंगापूर तालुक्यातील मेहंदीपूर आणि ठाणा या दोन्ही गावांमध्ये नागरिकांनी दूषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. शनिवारी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर यांनी ठाणा गावात जाऊन रुग्णांना भेट दिली.