महसूल कर्मचाऱ्यांची तीव्र निदर्शने

By Admin | Updated: January 23, 2017 23:42 IST2017-01-23T23:41:48+5:302017-01-23T23:42:59+5:30

जालना : महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करीत महसूल कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

Rapid demonstrations of revenue workers | महसूल कर्मचाऱ्यांची तीव्र निदर्शने

महसूल कर्मचाऱ्यांची तीव्र निदर्शने

जालना : महसूल कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करीत महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, महसूल विभागाने २० जानेवारी रोजी रात्री वाळूची अवैध वाहतूक करणारा एमएच २०/ सीटी असा अर्धवट क्रमांक असलेला ट्रक ताब्यात घेऊन तो तहसील कार्यालयात जमा केला होता. परंतु, या ट्रकशी संबंधित असलेल्या सहाजणांनी २१ जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तहसील कार्यालयात येवून येथील कोतवाल सोमनाथ गणेश सरफळे व विश्वंभर किसनराव केदार यांना शिवीगाळ करून तसेच धमकी देवून हा ट्रक पळवून नेला. त्यामुळे याबाबत याच दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास अंबड पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल करण्यात आली.
दरम्यान, या फिर्यादीच्या अनुषंगाने २२ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तपास अधिकारी पोउपनि विजय जाधव यांनी केदार यांना दूरध्वनी करून पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यामुळे संबंधित दोन्ही कोतवाल पोलिस ठाण्यात पोहोंचले. यावेळी जाधव व त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांनी या दोन्ही कोतवालांना खोटी फिर्याद देता का, अशी विचारणा करीत फिर्यादीमध्ये बेकायदेशीर बदल करण्यास सांगितले. परंतु, कोतवालांनी यास नकार दिल्यामुळे जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी दमदाटी तसेच शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. सोमनाथ सरफळे यांनी शिवीगाळीचा जाब विचारला असताना जाधव त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन्ही कोतवालांना लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. सरफळे यांना बेकायदेशिररित्या कोठडीमध्ये डांबून मारहाण करण्यात आली; तर जाधव यांनी त्यास स्वत:च्या पाया पडण्यास भाग पाडले. तसेच तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आयुष्य बरबाद करेन, अशी धमकीही दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. यानंतर या घटनेबाबत पोउपनि विजय जाधव यांच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी अंबड तहसीलदारांसोबत हे कोतवाल अंबर पोलिस ठाण्यात गेले असता तेथेही पोनि रामेश्वर खनाळ यांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकारी विजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, अन्यथा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना तसेच तलाठी संघ, महसूल कर्मचारी संघटना आणि कोतवाल कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या आंदोलनात जालन्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी, अंबड, घनसावंगी येथील तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, कोतवाल संघाचे पदाधिकारी आदी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Rapid demonstrations of revenue workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.