मिटमिटा शिवारात महिलेवर बलात्कार करून खून
By Admin | Updated: August 30, 2014 00:17 IST2014-08-30T00:13:07+5:302014-08-30T00:17:09+5:30
औरंगाबाद : शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेलेल्या विवाहितेवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

मिटमिटा शिवारात महिलेवर बलात्कार करून खून
औरंगाबाद : शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेलेल्या विवाहितेवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना मिटमिटा शिवारात घडली. मारेकऱ्यांनी विवाहितेला सुमारे एक किलोमीटर फरफटत नेऊन तिच्या अंगावरील साडीने गळफास देऊन एका झाडाला लटकवले.
अमिना बेगम शेख मुश्ताक (४०, रा. मिटमिटा) असे मृत महिलेचे नाव आहे. याविषयी छावणी पोलिसांनी सांगितले की, अमिना बेगम ही महिला शेळ्यांचा व्यवसाय करीत असे. रोज सकाळी १० वाजता शेळ्या चारण्यासाठी ती जंगलात जाई आणि सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी परतत असे. ती गुरुवारी सकाळी शेळ्या घेऊन मिटमिटा शिवारात गेली. सायंकाळी तिच्या शेळ्या परत आल्या; परंतु ती काही आली नाही. त्यामुळे तिच्या पतीसह नातेवाईकांनी जंगलात जाऊन तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही. मिटमिटा शिवारात असलेल्या तलावात ती पडली असावी, असा संशय शोधकर्त्यांना आला. त्यामुळे पतीने रात्री १ वाजेच्या सुमारास छावणी ठाणे गाठून पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.
औरंगाबाद : अमिना बेगम ही तलावात पडली असावी, असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. छावणी पोलिसांनी तत्परता दाखवून मनपा अग्निशामक दलाच्या जवानांना घटनेची माहिती कळविली. अग्निशामक दलाचे जवान, पोलीस आणि गावकऱ्यांनी मिटमिटा शिवारातील तलावात रात्री ३ वाजेपर्यंत तिचा शोध घेतला. मात्र, ती काही सापडली नाही. त्यामुळे त्यांनी शोधकार्य थांबविले. आज पहाटे शेख मुश्ताक आणि इतर गावकऱ्यांनी पुन्हा शोध सुरू केला. सकाळी साडेसहाच्या सुमारास तिचा मृतदेह साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही माहिती छावणी पोलिसांना देण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथे घटनास्थळापासून सुमारे एक किलोेमीटर अंतरावर तिचा जेवणाचा डबा, छत्री आणि चप्पल पडलेली दिसली. तेथून तिला एक किलोमीटरपर्यंत फरफटत ओढून नेण्यात आल्याचे आढळून आले. आरोपींनी तिच्यावर बलात्कार करून तिच्याच साडीने गळफास देऊन एका झाडाला लटकावण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
काही काळ तणाव...
अमिना बेगमचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी अमिना बेगमच्या खुन्या विरोेधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही पुढाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत काढली. घाटीतील डॉक्टरांकडून शवविच्छेदनाचा अहवाल मिळताच छावणी पोलिसांनी खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे मिटमिटा गावात तणाव निर्माण झाला होता. अंत्यविधीच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलीस उपायुक्त वसंत परदेशी हे छावणी ठाण्यात, तर सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक आघाव हे मिटमिट्यात बसून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते.