‘लिव्ह इन’मधील प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:11 IST2017-08-07T00:11:20+5:302017-08-07T00:11:20+5:30

सात वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या प्रेयसीने माजी सैनिक प्रियकराविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविला.

 Rape case against lover in Live Inn | ‘लिव्ह इन’मधील प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

‘लिव्ह इन’मधील प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सात वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या प्रेयसीने माजी सैनिक प्रियकराविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविला. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले.
लहू कडाजी नाटकर (३३, रा. जालना) असे आरोपीचे नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पीडिता आणि आरोपी यांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. आरोपीने पीडितेला पुंडलिकनगर परिसरात घर भाड्याने घेऊन दिले आणि तेथे ते सात वर्षांपासून राहत. या काळात त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यामुळे पीडिता आज पाच महिन्यांची गर्भवती आहे. यामुळे पीडितेने त्यास लग्नासाठी सतत आग्रह धरला. सुरुवातीला त्याने तिला आज करू, उद्या करू, असे सांगून वेळ मारून नेली. मात्र, बाळाच्या जन्मापूर्वी आपला विवाह होणे आवश्यक असल्याचे पीडितेने त्यास सांगताच आरोपीने लग्न करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. शिवाय यापुढे लग्नाचा विषय काढायचा नाही, असे म्हणून तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. प्रियकराने आपला विश्वासघात करीत अत्याचार केल्याची तक्रार तिने शनिवारी थेट पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड तपास करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी सांगितले. पीडिता ही येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करते. तो जालना येथून रोज ये-जा करून तिच्यासोबत राहत होता.

Web Title:  Rape case against lover in Live Inn