मुजोर रिक्षांना आरटीओचे अभय
By Admin | Updated: April 7, 2015 01:26 IST2015-04-07T01:03:32+5:302015-04-07T01:26:17+5:30
औरंगाबाद : सतत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, दादागिरी करणाऱ्या १५७ अॅपे, आॅटोरिक्षांचे प्रवासी वाहतुकीचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव तीन

मुजोर रिक्षांना आरटीओचे अभय
औरंगाबाद : सतत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, दादागिरी करणाऱ्या १५७ अॅपे, आॅटोरिक्षांचे प्रवासी वाहतुकीचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी वाहतूक शाखा पोलिसांनी आरटीओ कार्यालयाकडे पाठविला होता. विशेष म्हणजे त्यासाठी तीनदा स्मरणपत्रही देण्यात आले; परंतु ‘माये’पोटी आरटीओ कार्यालयाने अद्याप या रिक्षांचे परवाने निलंबित केलेले नाहीत. पोलिसांचा हा प्रस्ताव तसाच धूळखात पडून आहे.
अॅपे, आॅटोरिक्षाचालकांनी गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अक्षरश: उच्छाद मांडलेला आहे. क्षमतेपेक्षा तीन, चारपट अधिक प्रवासी बसविणे, जणू रस्ता केवळ आपल्यासाठीच आहे, अशा पद्धतीने रिक्षा चालविणे, प्रवासी घेण्यासाठी रस्त्यात कोठेही रिक्षा थांबवून वाहतुकीस खोळंबा निर्माण करणे, कुणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिवीगाळ, मारहाण करणे, असे प्रकार शहरातील रिक्षाचालकांकडून सुरू आहेत. रिक्षाचालकांची दादागिरी इतकी वाढली आहे की ते चक्क पोलिसांनाही मारहाण करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे चार दिवसांपूर्वी जालना रोडवर घडलेल्या घटनेवरून दिसून आले.
पोलिसांवर रिक्षाचालकाने केलेल्या हल्ल्यामुळे रिक्षाचालकांच्या दादागिरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्या घटनेनंतर वाहतूक शाखा पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरुद्ध मोहीम पुन्हा एकदा तीव्र केली आहे. मात्र, बेदरकार बनलेल्या रिक्षाचालकांना धडा शिकविण्यासाठी पोलिसांना आरटीओ कार्यालयाकडून तितकेसे सहकार्य मिळत नसल्याचे समोर आले आहे.