शॉर्टकटसाठी राँगसाईड चुकीचीच; ही वेळेची बचत ठरू शकते जीवघेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:05 IST2021-06-28T04:05:54+5:302021-06-28T04:05:54+5:30
साहेबराव हिवराळे औरंगाबाद : रस्त्यावर वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करा, असे वाहतूक शाखा कितीही सांगत असली तरी शॉर्टकटसाठी ...

शॉर्टकटसाठी राँगसाईड चुकीचीच; ही वेळेची बचत ठरू शकते जीवघेणी
साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : रस्त्यावर वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करा, असे वाहतूक शाखा कितीही सांगत असली तरी शॉर्टकटसाठी राँग साईड चुकीचीच असतानाही वेळेची बचत ही जीवघेणी ठरत आहे.
बीड बायपास रोड तसेच जालना रोड आणि जळगाव हे तीनही रोड शहरातून जाणारे प्रमुख मार्ग म्हणून ओळखले जाते. याच रस्त्यांशी शहराच्या बाहेर जाणारे मार्ग जोडले आहेत.
औद्योगिक विकासामुळे झपाट्याने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख निर्माण झाली आहे. परंतु या प्रमुख रस्त्यालगत कॉलनी व वसाहतीतील नागरिकांना घर गाठताना वळसा घालून ये-जा करण्यापेक्षा शॉर्टकटचा मार्ग अवलंबिला जातो. जीव धोक्यात घालून नागरिक बिनधास्त वाहने घेऊन सुसाट धावतात. जालना रोडवरील औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर तथागत चौकातून म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली असून, किरकोळ अपघात होतच आहेत. सिडको बसस्थानक ते नाईक कॉलेजपर्यंत तसेच हायकोर्टापासून ते पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्यांची विरूद्ध दिशेने वाहतूक सुरू असते. जळगाव रोडवर हर्सूल टी पॉइंटपर्यंतही धोक्याचीच घंटा सारखी वाजत असते.
बीड बायपासवर विरूद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्यांना दंड लावा की, गुन्हे दाखल करा त्याचा काहीही परिणाम या रस्त्यावरील वाहनधारकांवर झालेला दिसत नाही. वाहतूक शाखेचे पोलीसही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे तर कधी दंडात्मक कारवाई करताना दिसतात. जीवावर बेतूनही त्यांची जोखीम घेण्याची सवय मात्र अंगवळणीच पडली असल्याचे दिसते.
ही आहे राँग साईड
-१) बीड बायपास रोडवर संग्रामनगर पुलापासून ते देवळाई चौकलगतच्या दुतर्फा वसाहती, रेणुकामाता कमान, एमआयटी चौक आणि महानुभाव ते बजाज हॉस्पिटल असे राँग साईड जाणाऱ्यांची संख्या आढळते.
अपघातास निमंत्रण....
वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघाताच्या घटना घडत आहेत. सर्वात जास्त अपघात बीड बायपास रस्त्यावरच झालेले आहेत.
पोलीस असून नसून...
१) रस्त्यावर वाहतूक पोलीस असून देखील त्यांच्याकडे कानाडोळा करताना आढळून येतात. घर जवळ असून, अर्जंट काम असल्याने चाललो अशा थापा मारून निघून जातात.
२) जळगाव रोडवर व्होकार्ट ते बजरंग चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर औद्योगिक वसाहतीत घुसताना तसेच जळगाव हर्सूल टी पॉईंट आणि मोंढ्यात जाताना विरूद्ध दिशेने जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
अपघातास निमंत्रण...
पोलीस महत्त्वाच्या ठिकाणीच थांबलेले असतात, विविध सेक्टर, सिडको, हडकोत घुसणाऱ्या बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातास निमंत्रण ठरत आहे.
पोलीस असून नसून...
रस्त्यात आडवून दंडात्मक पावती फाडल्याशिवाय राँग साईड जाणाऱ्यांना लगाम बसणे शक्य नाही, दुर्लक्षपणामुळे वाहनचालक सुसाट दिसतात.
३) जालना रोडवर
वाहनचालक कारखान्यात जातांना वेळेत पोहोचण्याच्या प्रयत्नात अपघाताला सामोरे जात आहेत. जालना रोडवर धूत हॉस्पिटल , मुकुंदवाडी, सिडको बसस्थानकासमोर, हायकोर्टासमोरील भाग पंपापर्यंत ही धावपळ पाहण्यास मिळते.
-अपघातास निमंत्रण...
वाहने पुढे पळविण्याच्या प्रयत्नात स्वत: आणि पुढचा वाहनधारक देखील अपघाताला सामोरा जातो. विरूद्ध दिशेने जाऊ नका असा फलक लावूनही त्याकडे कानाडोळा करीत वाहने पळवितात.
- दंडात्मक कारवाई व्हावी ...
रस्त्यावर पोलिसाला पाहून वाहन परत फिरविले जाते किंवा ते सुसाट वेगाने पुढे दामटले जाते. दंडात्मक कारवाई गरजेची आहे.
विरूद्ध दिशेने जाणे धोकादायक...
अपघातास निमंत्रण ठरणाऱ्या बाबीकडे वाहनधारकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागतेच. अपघात घडल्यास स्वत:च्या किंवा समोरील वाहनाची मोठी हानी होते. प्रत्येक अपघाताची संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्यात एफआयआर होते.
- सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे (वाहतूक शाखा)
(स्टार डमी ८५७)