शाळा प्रवेशासाठी रात्रीपासून रांगा
By Admin | Updated: June 16, 2016 00:11 IST2016-06-15T23:53:38+5:302016-06-16T00:11:41+5:30
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई आपल्या पाल्याला नामांकित शाळामध्ये कोणत्याही परिस्थिीत प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी पालकांनी मंगळवारी रात्री ९ वाजेपासूनच शाळेच्या आवारात गर्दी केली

शाळा प्रवेशासाठी रात्रीपासून रांगा
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
आपल्या पाल्याला नामांकित शाळामध्ये कोणत्याही परिस्थिीत प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी पालकांनी मंगळवारी रात्री ९ वाजेपासूनच शाळेच्या आवारात गर्दी केली. काही पालकांनी तर शाळेच्या प्रवेशद्वारावरच मुक्काम ठोकला. बुधवारी नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाला. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाईत प्रवेशासाठी पडलेली पालकांची उडी लक्षवेधी ठरली.
आपला पाल्य दर्जेदार शिक्षण घेऊन गुणवंत व्हावा ही अपेक्षा बाळगून आलेल्या पालकांना कशाचीही तमा नसते. याचा प्रत्यय रात्रीपासून लागलेल्या रांगांमधून समोर आला. मंगळवारी रात्री नऊ वाजता योगेश्वरी नूतन विद्यालय व खोलेश्वर विद्यालयाच्या आवारात पालकांची गर्दी झाली. पाल्याला प्रवेश मिळेल की नाही याची चिंता बाळगून असलेल्या काही पालकांनी प्रवेशद्वारावरच अंथरून टाकून मुक्काम करणे पसंद केले. तब्बल १२ तास ताटकळल्यानंतर प्रवेशद्वार उघडले.
मात्र, बऱ्याच पालकांना उशिरा आल्यामुळे पाहिजे त्या शाळेत प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांची धांदल उडाली होती. तर ज्या पालकांनी रात्री नऊ वाजल्यापासून रांगेत रात्र काढली अशा पालकांना दिलासा मिळाला. एकाच दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत असल्यामुळे जोपर्यंत आपल्या पाल्याला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत पालकांमध्ये धास्ती कायम असते. शाळेतील विद्यार्थ्यांची मर्यादित संख्या व नामांकित शाळांकडे वाढता ओढा याचा मोठा फटका अनेक पालकांनी निमूटपणे सहन केला.
दरम्यान, ज्या पालकांना प्रवेश मिळाले त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, काहींना उशिरा आल्यामुळे प्रवेश भेटू शकला नाही. त्यामुळे त्यांची निराशा झाली. मोठ्या प्रमाणावर पालक प्रवेशासाठी आल्यामुळे शाळा प्रशासनाची देखील तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले होते.
संजय तिपाले ल्ल बीड
आरटीई (बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९) नुसार अनुसूचित जाती-जमाती दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेशाची सुविधा आहे. या प्रक्रियेत ‘शाळा’ झाल्याचे उघड झाले आहे. आॅनलाईन नोंदणीपेक्षा दुप्पट विद्यार्थी दाखवून सोडत काढल्याने मोफत प्रवेश प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
जिल्ह्यात १५० विनाअनुदानित इंग्रजी शाळा आहेत. आरटीईनुसार या शाळांनी मोफत प्रवेश देण्यापूर्वी आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक होते. मात्र, जिल्ह्यातील १२७ शाळांनी आॅनलाईन नोंदणी केली. या शाळांमध्ये २५ टक्के कोट्यातून १५७९ विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत होते. त्यासाठी पसंतीच्या शाळांकडे आॅनलाईन प्रवेश नोंदणी करावयाची होती. त्यानुसार १० जून या अखेरच्या तारखेपर्यंत ५२० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केल्याचे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिसत आहे. २१ शाळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यामुळे तेथे सोडत पद्धतीने निवड करावयाची होती. जि. प. शिक्षण विभागाने मात्र २५ टक्के कोट्यातून प्रवेशासाठी १०२८ विद्यार्थ्यांची नोंदणी असल्याचे दाखवले. हीच आकडेवारी गृहीत धरून सोडत काढण्यात आली आहे. २१ शाळांमध्ये २२८ जागा २५ टक्के कोट्यासाठी राखीव होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर शाळानिहाय नोंदणी केलेल्या विद्यार्थी संख्या व शिक्षण विभागाने सोडत काढताना दाखवलेली विद्यार्थी संख्या यात प्रचंड तफावत आहे. सोडत प्रक्रियेवेळी खुद्द सीईओ, डेप्युटी सीईओ व शिक्षणाधिकारी उपस्थित होते. मात्र, त्यांना अंधारात ठेवून आकडेवारीत घोळ करीत संस्थाचालकांचे हीत जपण्याचा ‘चोपडे’पणा कसा काय झाला ? याचीच चर्चा सध्या रंगू लागली आहे.