सीसीआयच्या केंद्रांवर रांगा
By Admin | Updated: January 3, 2015 00:17 IST2015-01-03T00:05:59+5:302015-01-03T00:17:10+5:30
सुनील कच्छवे, औरंगाबाद व्यापाऱ्यांकडून कापसाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे यंदा भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे.

सीसीआयच्या केंद्रांवर रांगा
सुनील कच्छवे, औरंगाबाद
व्यापाऱ्यांकडून कापसाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे यंदा भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. हमीभावावर कापूस विकण्यासाठी सीसीआयच्या केंद्रांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. आतापर्यंत मराठवाड्यातील २२ केंद्रांवर तब्बल १२ लाख २३ हजार क्विंटलची कापूस खरेदी करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख १३ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात यंदा कपाशीचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. तरीही कपाशीला म्हणावा तसा भाव मिळालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी घटल्यामुळे कपाशीचे भावही घसरले आहेत. बाजारपेठेत सध्या प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपेक्षाही कमी भावात कापूस खरेदी सुरू आहे.
गतवर्षी हाच भाव पाच हजार रुपये होता. सरकारने कापसाला यंदा प्रतिक्विंटल ४०५० रुपये इतका हमीभाव दिला आहे. बाजारात याहीपेक्षा कमी भाव मिळत असल्यामुळे यंदा सीसीआयच्या केंद्रांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. हमीभावावर कापूस विकण्यासाठी याठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने येत आहेत.
सीसीआयने यंदा मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड या सहा जिल्ह्यांत २२ खरेदी केंदे्र सुरू केली आहेत. या केंद्रांवर चालू वर्षी आतापर्यंत ४९३ कोटी रुपयांची कापूस खरेदी करण्यात आली आहे. अजूनही मोठ्या प्रमाणावर कापूस या केंद्रांवर येत आहे. सीसीआयच्या वतीने कापसाला यंदा तीन भाव जाहीर करण्यात आले आहेत. चांगल्या दर्जाच्या कापसाला प्रतिक्ंिवटल ४०५० रुपये, मध्यम दर्जाच्या कापसाला ३९५० रुपये आणि कमी दर्जाच्या कापसाला ३८५० रुपये प्रतिक्ंिवटल असे भाव आहेत. मराठवाड्यात सुरुवातीला पहिल्या वेचणीच्या कापसासाठी ४०५० रुपये भाव देण्यात आला. सध्या मध्यम दर्जाचा कापूस येत असल्यामुळे ३९५० रुपये दराने कापूस खरेदी सुरू आहे. पुढच्या टप्प्यात शेवटच्या वेचणीचा कापूस विक्रीसाठी येणार आहे.
मराठवाडा, खान्देशात सव्वासातशे कोटींची खरेदी
सीसीआयच्या औरंगाबादेतील विभागीय महाप्रबंधक कार्यालयांतर्गत मराठवाडा आणि खान्देश विभाग येतो. या दोन्ही विभागांत सीसीआयची एकूण ३५ केंद्रे सुरू आहेत. वरील सर्व केंंद्रांवर आतापर्यंत ७२५ कोटी रुपयांची कापूस खरेदी करण्यात आली आहे. सर्व ३५ केंद्रांवर एकूण १७ लाख ९६ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली असल्याचे महाप्रबंधक एस. के. पाणिग्रही यांनी सांगितले.