महापालिका सभेत रणकंदन
By Admin | Updated: July 8, 2017 00:41 IST2017-07-08T00:40:13+5:302017-07-08T00:41:12+5:30
औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

महापालिका सभेत रणकंदन
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी तिजोरीत येण्यापूर्वीच महापालिकेतील राजकीय वातावरण शुक्रवारी बरेच तापले. सर्वसाधारण सभेत निधी आणण्याचे श्रेय एकट्या भाजपने घेत पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आखला. याला शिवसेनेने कडाडून विरोध दर्शवून शासनाकडून निधी आणण्यात आमच्या पक्षाचाही तेवढाच वाटा असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, सत्ताधारी भाजपने मित्रपक्षांकडे दुर्लक्ष केल्याने शिवसेना नगरसेवकांनी बहिष्काराचे अस्त्र उपसले. यापुढे भाजपला अजिबात सहकार्य करणार नसल्याची घोषणा करण्यात आली. सेनेसोबत भाजपचे खटके उडताच एमआयएमने १०० कोटींच्या रस्त्यांची यादी द्या, असा आग्रह महापौरांकडे धरला. चीन दौरा रद्द करा, या दोन मागण्यांसाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी चक्क राजदंड पळविला. शेवटी भाजपने गणपूर्ती नसतानाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने तीन तास सभा चालविली.
१०० कोटी रुपये शासनाकडून मंजूर होताच शहरात भाजपच्या नेत्यांनी श्रेय लाटण्यासाठी जागोजागी मोठमोठे होर्डिंग लावले. या निधीतून नेमके कोणते रस्ते करण्यात येणार याचा उलगडा भाजप करायला तयार नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सेना-भाजपमध्ये जोरदार सुंदोपसुंदी सुरू होती. शुक्रवारी दुपारी २ वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच ज्येष्ठ नगरसेवक राजू शिंदे यांनी १०० कोटी रुपयांचा निधी शहरासाठी आणल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष, विधानसभेचे सभापती, भाजप आमदार, महापौर आदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. भाजप गटनेते प्रमोद राठोड यांनी अनुमोदन दिले.