कोंडमध्ये रणरागिणींचा दारूबंदीचा एल्गार
By Admin | Updated: November 28, 2014 01:10 IST2014-11-28T00:15:20+5:302014-11-28T01:10:35+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील कोंड येथील रणरागिणींनी अवैध दारूविक्री बंद करण्याचा एल्गार पुकारला असून, युवकांनीही दारूबंदी समिती गठित केली आहे़

कोंडमध्ये रणरागिणींचा दारूबंदीचा एल्गार
उस्मानाबाद : तालुक्यातील कोंड येथील रणरागिणींनी अवैध दारूविक्री बंद करण्याचा एल्गार पुकारला असून, युवकांनीही दारूबंदी समिती गठित केली आहे़ दरम्यान, ढोकी पोलिस ठाण्यांतर्गतच्या पळसप पाठोपाठ कोंड ग्रामस्थांनीही दारूबंदीसाठी कंबर कसली असून, पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष वेधले आहे़
जवळपास दहा हजार लोकवस्तीचे कोंड हे गाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे़ सीमावर्ती भागात हे गाव असल्याने अवैध धंदे चालविणाऱ्यांची चांदी होत आहे़ मुळात पैलवानांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात दारूसह इतर अवैध धंद्यांना ऊत आल्याने युवक पिढी बरबाद होवू लागली आहे़ शिवाय वाढणारे भांडण-तंटे, उध्दवस्त होणारे संसार यामुळे अनेकजण देशोधडीला लागले आहेत़ शिवाय कोठेही पडणारे तळीराम आणि त्याचा महिला मुलींना होणारा त्रास हे सर्व प्रकार रोखण्यासाठी व गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी कोंडकर एकवटले आहेत़ पोलिस कर्मचारी असोत अथवा राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी, कर्मचारी असोत. अवैध धंदेवाल्यांविरूध्द कारवाई करीत नसल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे़ दारूबंदीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे़ विशेष म्हणजे दारूविक्री होत असलेल्या ठिकाणांची नावेही नमूद करण्यात आली आहेत़ निवेदनावर ४१ महिला, युवकांच्या स्वाक्षरी आहेत़ दारूविक्रेत्यांवर कारवाई नाही झाली तर आंदोलन उभा करण्याचा इशाराही देण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
कोंड येथील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांचा ताफा आला होता़ गावातील मुख्य दारूविक्रेते मात्र, त्यादिवशी गायब होते़ दिवसभर फिरलेल्या कर्मचाऱ्यांनी एकावर कारवाई करून काढता पाय घेतला़ त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी कारवाईचा केवळ फार्स केल्याचे म्हटले जात आहे़
कायम लढत राहू
पहैलवानांचे गाव म्हणून कोंडची जिल्ह्यात ओळख आहे़ मात्र गत काही वर्षापासून दारूसह इतर अवैध धंद्यामुळे युवक पिढीच वाईट मार्गाला लागत आहे़ या युवकांचे उध्दवस्त होणारे आयुष्य वाचविण्यासाठी यापुढील काळात दारूबंदी समिती कायम लढत राहणार असल्याचे समितीचे अध्यक्ष तुकाराम भोसले म्हणाले़४
दारूबंदीसाठी कोंड येथील युवकांनीही पुढाकर घेतला आहे़ दारूबंदीसाठी गठीत केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी तुकाराम भोसले-पैलवान, उपाध्यक्षपदी किरण परदेशी, सचिवपदी रविकिरण मोरे, कोषाध्यक्ष म्हणून शकिल मुलाणी, सहसचिवपदी गोवर्धन भोसले यांची निवड करण्यात आली आहे़ तर सदस्य म्हणून दत्ता सर्जे, उमेश जाधव, अमोल जाधव, हुकुमत मुलाणी, सतिश चव्हाण यांच्यासह २० युवकांचा समावेश करण्यात आला आहे़
लवकरच विशेष ग्रामसभा
४दारूबंदीसाठी गावातील महिला एकत्रित आल्या असून, ग्रामपंचायतही त्यांच्या मागणीनुसार लवकरच विशेष महिला ग्रामसभा घेणार आहे़ ग्रामसभेचा ठराव पोलिस प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांना देवून दारूबंदीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच इमामबी मुलाणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़