कष्टाच्या पैशातून रामवाडीत जयंती
By Admin | Updated: April 10, 2015 00:27 IST2015-04-10T00:20:56+5:302015-04-10T00:27:11+5:30
सुमेध वाघमारे, तेर आंबेडकरी विचार मानणारे अनेकजण स्वत:हून वर्गणी देतात. समाजातील लोकांकडूनही वर्गणी मिळते. मात्र ही रक्कम जयंती उत्सवासाठी कमी पडत असल्याने

कष्टाच्या पैशातून रामवाडीत जयंती
सुमेध वाघमारे, तेर
आंबेडकरी विचार मानणारे अनेकजण स्वत:हून वर्गणी देतात. समाजातील लोकांकडूनही वर्गणी मिळते. मात्र ही रक्कम जयंती उत्सवासाठी कमी पडत असल्याने तालुक्यातील रामवाडी येथील सुमारे वीस तरुण जयंतीपूर्वी दहा ते पंधरा दिवस मजुरीचे काम करून या रकमेतून जयंती साजरी करण्याचा उपक्रम मागील अनेक वर्षापासून राबवित आहेत. बाबासाहेबांनी आयुष्य वेचून आमचे जीवन घडविले. मग त्यांच्या जयंतीसाठी कोणापुढे कशाला हात पसरायचा? असा या तरुणांचा सवाल आहे.
तेरपासून सुमारे पाच किमी अंतरावर रामवाडी गाव आहे. बौद्ध समाजाची येथे सुमारे चाळीस घरे असून, यातील बहुतांश जणांचा उदरनिर्वाह मजुरीवरच होतो. डॉ. आंबेडकर जयंतीसाठी या चाळीस घरातून ठराविक रक्कम जमा करण्यात येत होती. गावातील काहीजण स्वखुशीने वर्गणी देतात. मात्र त्यानंतरही पुरेसे पैसे जमा होत नसल्याने जयंती कशी साजरी करायची? असा प्रश्न होता. यावर विचार सुरू असताना, काही तरुणांनी जयंती उत्सवासाठी आपण ठराविक दिवस मजुरीचे सामूदायिक काम करू, आणि यातून मिळणारी रक्कम जयंती उत्सवासाठी वापरू, असा विचार मांडला. इतरांनीही या कल्पनेला दुजोरा दिल्यानंतर येथील वीस युवकांनी गावातीलच काहींच्या शेतात आठवडाभर काम करून मजुरीतून प्राप्त झालेल्या रक्कमेतून जयंती उत्सव साजरा केला. मागील अनेक वर्षांपासून रामवाडीतील तरुण याच मार्गाने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करतात. जयंती निमित्ताने संपूर्ण वस्तीत विद्युत रोषणाई केली जाते. या बरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यासाठी बार्शी येथून खास रथही मागविला जातो. शाहीरी, पोवाड्यांच्या कार्यक्रमाबरोबरच जिल्ह्यातील विविध मान्यवरांना जयंतीसाठी बोलाविले जाते. तसेच जयंतीनिमित्ताने ग्रामस्थांना स्रेहभोजन देण्याची परंपराही रामवाडीकर आवर्जून पाळतात. २०१० मधील जयंतीची आठवण सांगताना, समितीचे पदाधिकारी म्हणाले की, त्यावेळीही आमच्याकडे पुरेसे नव्हते. मात्र जयंती तर झालीच पाहिजे. त्यामुळे आम्ही गावातील काही जणांच्या शेतातील ज्वारी काढण्याचे गुत्ते घेतले. या गुत्त्यापोटी काही ज्वारी प्राप्त झाली. ही ज्वारी बाजारात विकून त्यातून मिळालेल्या रकमेतून आम्ही मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केली. कष्टाच्या पैशातून जयंती साजरी करण्याचा, बाबासाहेबांचे स्मरण करण्याचा आनंद काही औरच असल्याचे या युवकांनी नमूद केले. मिरवणुकीसाठी लेझीम, झांज पथक असते. ग्रामस्थही या आनंदात सहभागी होतात असे त्यांनी सांगितले.