रामदास आठवले यांच्या रिपाइंला निवडणूक तर लढायचीय; पण चिन्हाबाबतचा संभ्रम कायम
By विजय सरवदे | Updated: December 17, 2025 14:14 IST2025-12-17T14:11:40+5:302025-12-17T14:14:21+5:30
पक्षात दोन प्रवाह; भाजपच्या 'कमळ' चिन्हावर लढायचे की स्वतंत्रपणे, रिपाइंची ओळख जपायची?

रामदास आठवले यांच्या रिपाइंला निवडणूक तर लढायचीय; पण चिन्हाबाबतचा संभ्रम कायम
छत्रपती संभाजीनगर : रिपाइंने (आठवले) उत्स्फूर्तपणे महापालिका निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. महायुतीमध्ये भाजपकडे १५ जागांची मागणी केली. जर त्यांनी काही जागा रिपाइंला सोडल्या, तर भाजपचे ‘कमळ’ की अन्य कोणत्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जायचे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रिपाइंने निवडणूक आयोगाकडे ‘ऊस उत्पादक शेतकरी’ या चिन्हाची मागणी केली आहे. मात्र, अद्याप आयोगाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पक्षामध्ये चिन्हाबद्दलचा संभ्रम कायम आहे.
यासंदर्भात रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसह जि.प., पं.स. निवडणुकीत यावेळी आमचा पक्ष महायुतीसोबत समर्थपणे रिंगणात उतरणार आहे. पण, महाराष्ट्रात रिपाइंला स्वतंत्र चिन्ह नाही. या पार्श्वभूमीवर राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ‘चिन्हा’चा प्रश्न चर्चेला आला होता. तेव्हा, ‘ऊस उत्पादक शेतकरी’ या चिन्हावर एकमत झाले. याच चिन्हावर नागालँडमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत रिपाइंचे दोन उमेदवार निवडून आले. हेच चिन्ह महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपाइंला मिळावे, म्हणून निवडणूक आयोगाकडे आपण मागणी केली आहे. त्यावर आयोगाने अद्याप निर्णय कळविलेला नाही. जर हे चिन्ह महापालिका निवडणुकीसाठी आयोगाने अंमलात आणले, तर राज्यभरातील महापालिका निवडणुकीत रिपाइंचे उमेदवार याच चिन्हावर लढतील. आमच्या पक्षात चिन्हाबाबत दोन प्रवाह आहेत. एक युतीमध्ये ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी, तर दुसरा प्रवाह हा पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी युतीतच निवडणूक लढवू, पण ‘कमळ’ नको, असा आहे.
बुधवारी दुपारी रिपाइंच्या शहर, जिल्हा व सर्व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात उमेदवारांना अर्ज वाटप केले जातील. त्यानंतर एक-दोन दिवसांत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवायची, हे देखील पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले जाईल.
१५ जागांचा प्रस्ताव
रिपाइंने भाजपकडे १५ जागांचा प्रस्ताव दिला आहे. यासंदर्भात दोन-चार दिवसांत त्यांच्याकडून नेमक्या किती जागा सोडणार, याबद्दल समजेल. आमच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांसाठी काम केले आहे. आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे रिपाइंसाठी भाजपला जागा सोडाव्या लागतील.