रामनवमी अपार उत्साहात

By Admin | Updated: April 16, 2016 01:46 IST2016-04-16T01:00:45+5:302016-04-16T01:46:28+5:30

औरंगाबाद : किराडपुऱ्यातील श्रीराम मंदिरात शेकडो भाविक ‘श्रीराम जय राम जय जय राम’ नाम जप करीत होते. दुपारचे १२ वाजले आणि पडद्या बाजूला झाला

Ram Navami is very excited | रामनवमी अपार उत्साहात

रामनवमी अपार उत्साहात


औरंगाबाद : किराडपुऱ्यातील श्रीराम मंदिरात शेकडो भाविक ‘श्रीराम जय राम जय जय राम’ नाम जप करीत होते. दुपारचे १२ वाजले आणि पडद्या बाजूला झाला...श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाचे दर्शन होताच साऱ्यांचे मन प्रसन्न झाले... भाविकांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ असा उत्स्फूर्तपणे जयघोष केला. भजनी मंडळानेही ‘राम जन्मला गं सखी रामजन्मला’ असे गाणे गाऊन रामजन्मोत्सव शिगेला नेऊन ठेवला.
शुक्रवारी शहरात रामनवमी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच ठिकठिकाणच्या राममंदिरांमध्ये लगबग सुरू झाली होती. काकडा आरती, पूजा करण्यात आली. शहरातील श्रीरामाचे सर्वात मोठे मंदिर किराडपुरा भागात आहे. या मंदिरातील पूजारी गणेश जोशी यांनी येथील ५ फूट उंच श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सीता व हनुमानाच्या मूर्तीला सजविले होते. मंदिराबाहेर सतीश भोसले आणि सहकारी भक्तिगीत गात होते. जसजशी दुपारी बाराची वेळ जवळ येऊ लागली तसतशी मंदिरात भाविकांची गर्दी वाढू लागली. मंदिराच्या गाभाऱ्यात पडदा लावण्यात आला होता. उपस्थित सर्व रामभक्त ‘श्रीराम जय राम जय जय राम’ नाम जप करीत होते .

आणि १२ वाजेची घंटा झाली आणि गाभाऱ्यातील पडदा बाजूला झाला. सर्वांना श्री प्रभूरामचंद्राच्या मूर्तीचे दर्शन घडले. या उत्साहात सर्वांनी एकसाथ ‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष केला. यानंतर खा.चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, उपमहापौर प्रमोद राठोड, प्रदीप जैस्वाल, भागवत कराड, नगरसेवक शिवाजी दांडगे, कचरू घोडके, माजी धर्मादाय सहआयुक्त दिलीप खोत या मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लड्डा, श्रीराम मंदिराचे अध्यक्ष मानसिंग पवार, कन्हैयालाल सिद्ध, लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल, दयाराम बसैये, भास्करराव बेलसरे, उत्तमराव मनसुटे, राजेंद्र बसैये आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी ४० भाविकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तसंकलनाचे कार्य दत्ताजी भाले रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले. अनेक युवक दुचाकीवर भगवा ध्वज लावून वाहन रॅलीने किराडपुरा येथे दर्शनासाठी आले होते. जाणताराजा मंडळातर्फे अशी वाहन रॅली काढण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत मंदिरात दर्शनासाठी गर्दी दिसून आली. भाविकांना बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात येत होता.
राजनगर
शहानूरवाडी परिसरातील राजनगरात सकाळी १० वाजता हभप रामदासी महाराजांच्या कीर्तनाला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजता येथे रामजन्माची आरती करण्यात आली. परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी येथे गर्दी केली होती.
श्रीरामनगर
श्रीरामनगरमधील राममंदिरात सकाळी हभप अनुराधा पिंगळीकर यांचे श्रीरामजन्मावरील कीर्तन झाले. रामजन्माची सामूहिक आरती झाल्यानंतर बासरीवादक बाबूराव दुधगावकर यांचा बासरीवादनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री स्वरसाधना ग्रुपच्या वतीने गीत रामायण कार्यक्रम सादर करण्यात आला.
दीपनगर
दीपनगरातही श्रीरामजन्मोत्सवासाठी हडको परिसरातील रामभक्त मोठ्या संख्येने जमा झाले होते. दुपारी नगरसेविका स्वाती नागरे व किशोर नागरे यांच्या हस्ते श्रीरामचंद्रांची आरती करण्यात आली. यावेळी अध्यक्ष टी. टी. पाटील, हेमंत कुलकर्णी, गणेश साभरकर, सी. डब्ल्यू. पवार, सोमनाथ जाधव, आर. बी. पाटील, मंगेश कांबळे आदींची उपस्थिती होती. रात्री ८ वाजता क्षमा नांदेडकर यांच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे येथे आयोजन करण्यात आले होते.
समर्थनगर
समर्थनगर येथील श्रीराम मंदिरात सकाळी श्रीराम रोडे यांचे कीर्तन रंगले. श्रीरामजन्माच्या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष ज्योती चिटगोपेकर व डॉ. प्रदीप चिटगोपेकर यांच्या हस्ते आरती करण्यत आली. यावेळी सीमा रिसबूड, सुषमा धांडे, कृष्णा पाडळकर, अ‍ॅड. प्रशांत पालीमकर, अरुण जोशी, सदानंद मिरजगावकर, विनिता पानसे, रघुवीर जोशी, श्रीराम धानोरकर, मानसी याडकीकर आदींची उपस्थिती होती. मंदिर परिसरात दत्ताजी भाले रक्तपेढीतर्फे रक्तदान घेण्यात आले. उद्या १६ रोजी सकाळी ७ वाजता श्रीच्या मूर्तीची पालखी निघणार आहे.
चौकट
अमृतेश्वर राममंदिर
कुंभारवाडा येथील ८७ वर्षे जुने अमृतेश्वर राममंदिरात पारंपरिक पद्धतीने रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. येथे सकाळी अपूर्वा मुळे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी १२ वाजता विघ्नहर्ता क्रीडा मंडळाच्या ढोल-ताशांच्या निनादाने सर्व परिसर दुमदुमला होता. येथील पूजारी सुहास व्यवहारे, प्रांजल व्यवहारे, गोविंद व्यवहारे यांनी भगवंतांची विधीवत पूजा करून आरती केली.
चौकट
अंजनीनगर
देवळाई परिसरातील अंजनीनगर येथील रामकृष्ण मंदिरातही श्रीरामनवमीसाठी पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी सुरू झाली होती. या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त येथे ८ एप्रिलपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन सुरू आहे. आज रामजन्मोत्सवाचे कीर्तन सद्गुरू विजयानंद महाराज यांनी केले. यावेळी सामूहिक आरती करण्यात आली. दुपारी अनुपानंद महाराजांनी वाल्मिकी रामायण सांगितले. यावेळी बाळासाहेब पिल्ले, शंकरराव सूर्यवंशी, चंद्रकांत गौरे यांच्यासह परिसरातील भाविकांची गर्दी झाली होती.
———
श्रीरामचंद्र भाविकांच्या भेटीला
दर्शनासाठी गर्दी : किराडपुऱ्यातून निघाली शोभायात्रा
किराडपुरा येथील श्रीरामचंद्र मंदिरातून सायंकाळी श्रीप्रभू रामचंद्राची शोभयात्रा काढण्यात आली. ‘सियावर रामचंद्र की जय’ अशा जयघोषात मंदिरातून श्रीप्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता व हनुमानाच्या मूर्ती सजविलेल्या रथात आणण्यात आल्या. यानंतर देवळाई येथील पोलीस पाटील हरिभाऊ रसाळ यांच्या हस्ते रथाचे पूजन व आरती करण्यात आली. यानंतर वाजतगाजत शोभायात्रेला सुरुवात झाली. वर्षभरात एकदाच श्रीरामनवमीला श्रीरामचंद्र भगवंत भाविकांच्या भेटीला मंदिराबाहेर पडत असतात. शोभायात्रा सिडको एन-६ येथील मथुरानगर, संभाजी कॉलनीमार्गे आविष्कार कॉलनीत आली. रामभक्तांनी रस्त्यावर सडा टाकला होता. महिलांनी सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या. शोभायात्रेत दर्शन घेणाऱ्या भाविकांना बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात येत होता. भाविक ‘सियावर रामचंद्र की जय’ अशा जयघोष करीत होते. साईनगर, गुलमोहर कॉलनी, बजरंग चौक, माता मंदिरमार्गे रात्री शोभायात्रा किराडपुऱ्यातील मंदिरात येऊन पोहोचली.


श्रीरामाच्या मूर्तीने लक्ष वेधले
शोभायात्रा : श्रीरामनवमी जन्मोत्सव समिती
औरंगाबाद : ‘जय श्रीराम’ असा जयघोष करीत श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीतर्फे शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेतील श्रीरामाच्या भव्य मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले.
शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिर येथे सायंकाळी शोभायात्रेला सुरुवात झाली. प्रारंभी आ.अतुल सावे, उपमहापौर प्रमोद राठोड, प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, बापू घडामोडे यांच्या हस्ते गणपती व श्रीरामाच्या मूर्तीची आरती करण्यात आली. समोरील बाजूस सजविलेल्या रथात श्रीरामाची छोटी मूर्ती ठेवण्यात आली होती. तर पाठीमागील बाजूस असणाऱ्या वाहनात सूर्याच्या प्रतिमेसमोर भव्य श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आली होती. मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. अनेक भाविक आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात भगवंतांची छबी टिपत होते. भगवंतांच्या मूर्तीच्या बाजूला लहान मुलांना उभे करून त्यांचा फोटो काढला जात होता. ‘जय श्रीराम’ असा जयघोष करीत शोभायात्रा शहागंजातून गांधी पुतळा चौकात आली. येथे बँड पथकाच्या तालावर युवक नृत्य करीत होते. धार्मिक, देशभक्तीपर गीत वाजवून बँड पथकांनी रंगत भरली. शोभायात्रा सराफा रोड, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडीमार्गे कुंभारवाड्यातील अमृतेश्वर राममंदिरासमोर पोहोचली. येथे श्रीराम भगवंतांची आरती करण्यात आली. यावेळी पृथ्वीराज पवार, जगदीश सिद्ध, लक्ष्मीनारायण बाखरिया, गोपी घोडेले, गजेंद्र सिद्ध, राहुल भाठी यांच्यासह जन्मोत्सव समितीचे कार्यकर्ते, रामभक्त शोभायात्रेत सहभागी झाले होते.


कैलासनगरातील श्रीराम शोभायात्रा
रामनवमी : भगवा फेटा बांधून महिलाही सहभागी
औरंगाबाद : कैलासनगरातील श्रीराम देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. यात भगवा फेटा बांधून महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
कैलासनगरातील श्रीराम मंदिरात दुपारी श्रीरामजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. सजविलेल्या पाळण्यात श्रीरामाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. यावेळी महिलांनी जन्मोत्सवाचे गाणे गायले. नगरसेविका आशा भालेराव व नरेश भालेराव यांनी श्रीरामाची आरती केली. सायंकाळी ७.३० वाजता वाजत गाजत श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही भगवा फेटा बांधून या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. विविध धार्मिक गाण्यांवर युवक नृत्य करीत होते. शोभायात्रा कैलासनगर, जालना रोड, मोंढानाका, लक्ष्मण चावडी, कैलासनगर गल्ली नं.३ मार्गे श्रीराम मंदिरात पोहोचली. या शोभायात्रेत श्रीराम देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पी. बी. पैठणकर, उत्तमराव लोखंडे, रामेश्वर लोखंडे, दिलीप अग्रवाल, दिगंबर उदावंत, दगडूदास वैष्णव, सचिन माठे, संदीप फुले, श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश अंबिलवादे, बाळू माडजे, रोहित उदावंत, रितेश कोठाळे, अमोल भालेराव, भगवान उंटवाल, रवी पैठणकर, योगेश दिवटे, गौरव राऊत, लौकिक अडणे, छाया भालेराव, अशोक भालेराव, राजेंद्र दानवे, संजय लोहिया, सुभाष राजपूत, रवी लोढा यांच्यासह कैलासनगरातील नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Ram Navami is very excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.