जिल्हाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत चढाओढ
By Admin | Updated: April 17, 2015 00:43 IST2015-04-17T00:20:05+5:302015-04-17T00:43:42+5:30
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मातब्बरांनी पक्षाचे जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केल्याने पेच वाढला आहे

जिल्हाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत चढाओढ
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मातब्बरांनी पक्षाचे जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केल्याने पेच वाढला आहे. गुरुवारी पक्षांतर्गत निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जीवनराव गोरे यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे इच्छुक १६ जणांची नावे घेऊन ते परतले. आता बारामतीदरबारीच फैसला होणार आहे.
अशोक डक हे २००७ पासून जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. सलग तीन टर्म त्यांनी कारभार पाहिला. दर तीन वर्षानंतर पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीचा नियम आहे. त्यानुसार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तालुका, जिल्हा, विभाग, राज्यपातळीवरील कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरु आहे. गुरुवारी बीड जिल्हाध्यक्ष निवडीचे नाव निश्चित करण्यासाठी ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांना पक्षाने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धाडले होते. पक्ष कार्यालयात त्यांनी बैठक घेतली. यावेळी अशोक डक यांनाच पुन्हा जिल्हाध्यक्षपद द्यावे, असा सूर उमटला होता. मात्र, माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी दावा केला. त्यानंतर इच्छुकांची संख्या वाढली.
त्यामुळे गोरेंपुढे पेच निर्माण झाला. शेवटपर्यंत एकमत होऊ शकले नाही. आता बारामतीदरबारी कोणाच्या नावाची जादू चालते? यावरच भावी जिल्हाध्यक्ष अवलंबून आहे.
यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री सुरेश धस, प्रकाश सोळंके, बदामराव पंडित, माजी आ. उषा दराडे, राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, जि.प. सभापती संदीप क्षीरसागर, युवक राष्ट्रवादीचे अॅड. शेख शफिक, अक्षय मुंदडा, भाऊसाहेब नाटकर यांची उपस्थिती होती.
गटबाजीचे दर्शन!
जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षपदांसाठी प्रमुख नेत्यांकडून नावे मागवून घेतली तेंव्हा एका तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गटांची नावे आली. गेवराईत आ. अमरसिंह पंडित यांच्या गटाने जिल्हाध्यक्षपदाकरता दोन नावे सूचविली तर माजी आ. बदामराव यांनी स्वत:चे नाव पुढे केले आहे. केजमध्ये अक्षय मुंदडा यांनी दोन नावे दिली तर माजी आ. पृथ्वीराज साठे यांनी स्वत:साठीच जोर लावला आहे.
माजलगावात माजी मंत्री प्रकाश सोळंके व विद्यमान जिल्हाध्यक्ष अशोक डक यांच्यातच चढाओढ आहे. बीड, आष्टी या मतदारसंघातून मात्र अनुक्रमे आ. जयदत्त क्षीरसागर व माजीमंत्री सुरेश धस यांच्याकडूनच इच्छुकांची नावे आली आहेत. (प्रतिनिधी)