औरंगाबादच्या विकासात राजेंद्र दर्डा यांचा सिंहाचा वाटा -अब्दुल सत्तार

By Admin | Updated: October 11, 2014 00:40 IST2014-10-11T00:29:27+5:302014-10-11T00:40:05+5:30

औरंगाबाद : राजेंद्र दर्डा नेहमीच मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादची बाजू ठामपणे मांडतात.

Rajendra Darda's remarkable contribution in the development of Aurangabad - Abdul Sattar | औरंगाबादच्या विकासात राजेंद्र दर्डा यांचा सिंहाचा वाटा -अब्दुल सत्तार

औरंगाबादच्या विकासात राजेंद्र दर्डा यांचा सिंहाचा वाटा -अब्दुल सत्तार

औरंगाबाद : गेल्या पंधरा वर्षांमध्ये राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबादमध्ये अनेक विकासकामे केली आहेत. पिण्याचे पाणी ते डीएमआयसीपर्यंत अनेक योजना आणण्यासाठी ते नेहमीच मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादची बाजू ठामपणे मांडतात. आज औरंगाबादचा जो विकास झाला आहे त्यामध्ये राजेंद्र दर्डा यांचा सिंहाचा वाटा असल्याचे ठाम मत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रेंगटीपुरा येथील जाहीर सभेत व्यक्त केले.
काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारार्थ रेंगटीपुरा, बायजीपुरा आणि चंपाचौक भागात जाहीर सभांचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राजेंद्र दर्डा, आ. सुभाष झांबड, कदीर मौलाना, सुरजित खुंगर यांची समयोचित भाषणे झाली. तीनही सभांना नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मवाळ आणि अच्छा आदमी अशी प्रतिमा असलेले राजेंद्र दर्डा हे नेहमीच विकासात सर्वांत अग्रेसर राहिले आहेत. महानगरपालिकेत युतीची सत्ता असतानाही लोकांच्या हितासाठी राजेंद्र दर्डा यांनी समांतरसाठी केंद्रातून पैसे उपलब्ध करून दिले. शहरात हज हाऊस, वंदेमातरम् सभागृह, आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी विकासकामांसह सिमेंट रस्ते आणि ड्रेनेजलाईनचे काम करून जनाधार मिळविला आहे.
शिक्षण क्षेत्रात मागच्या २० वर्षांमध्ये झाले नाही एवढे चांगले काम त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये केले आहे. विद्यार्थ्यांना एक वर्ष आधी परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यापासून ते शिक्षकांचे पगार बँकेत जमा करण्यापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यांनी शिक्षण क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे. त्यांच्या विकासकामांपुढे कुणीच टिकू शकणार नाही. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वांत जास्त मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार राजेंद्र दर्डा असणार आहेत, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
राजेंद्र दर्डा आपल्या भाषणात म्हणाले की, मागच्या पंधरा वर्षांत मी औरंगाबादेत विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. आपले प्रत्येक मत बहुमूल्य आहे. त्याचा उपयोग विकासाची गती वाढविण्यासाठी करा, असे आवाहन राजेंद्र दर्डा यांनी केले.
आ. सुभाष झांबड यांनी एमआयएम पक्षावर जोरदार टीका केली. एमआयएमचे लोक नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केला असून ते भाजपाची मदत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे मतदार बंधूंनी भविष्यातील धोके लक्षात घेऊन काय करायचे आहे, ते ठरवायला पाहिजे. सध्या निवडणुकीतील पाच पक्षांमध्ये फक्त काँग्रेसच धर्मनिरपेक्ष पक्ष असून काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन आ. झांबड यांनी केले.
कदीर मौलाना यांनी आपल्या भाषणात राजेंद्र दर्डा यांच्या विकासकामांची अनेक उदाहरणे दिली. हज हाऊस, हजयात्रेसाठी स्वतंत्र विमान, शहरात अनेक भागांमध्ये शादीखाने उभारून राजेंद्र दर्डा यांनी लोकहिताचे काम केले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने आतापर्यंत फक्त कब्रस्तानाच्या जमिनी लाटण्याचे काम केले आहे. त्यामुळे जनतेने ठरवायचे आहे की, आपल्याला कुणाला निवडून द्यायचे आहे. एमआयएमसारख्या पक्षांपासून या देशाच्या एकसंधतेला धोका निर्माण झाला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून हैदराबादला हाकलून काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन कदीर मौलान यांनी केले.
रेंगटीपुरा येथील सभेला डॉ. जफर खान, तकी हसन, जितसिंग करकोटक, नगरसेवक शेख हबीब कुरेशी, कलीम कुरेशी, दौलतभाई, सलीम कुरेशी, नईम कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. बायजीपुरा येथील सभेत शेख समीर, गणेश सोनवणे, अबू बकर अमोदी, सलीम पटेल, अब्दुल रशीद आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Rajendra Darda's remarkable contribution in the development of Aurangabad - Abdul Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.