‘राजेंद्र दर्डाजी हमारे नेता हैं’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर
By Admin | Updated: October 14, 2014 00:39 IST2014-10-14T00:17:58+5:302014-10-14T00:39:48+5:30
औरंगाबादकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादात निघालेल्या भव्य पदयात्रेने पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाली.

‘राजेंद्र दर्डाजी हमारे नेता हैं’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर
औरंगाबाद :
‘राजेंद्रबाबूजी जो साथ है,
कंधो पर सबके हाथ है,
प्रगती की राह पर,
गरिबों की चाह पर,
खुशयाली बरसाते हैं,
बाबूजी हमारे नेता हैं’च्या घोषणांनी पूर्व मतदारसंघ सोमवारी दुमदुमला.
औरंगाबादकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादात निघालेल्या भव्य पदयात्रेने पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाली. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या महिला, तरुण व नागरिकांच्या जोश व उत्साहाने मतदारसंघ ढवळून निघाला. मौलाना आझाद चौकातून सोमवारी दुपारी २.३० वाजता पदयात्रेच्या या झंझावातास प्रारंभ झाला. तिरंगी ध्वज, डोक्यावर टोप्या, गळ्यात तिरंगी रुमाल आणि हाती पंजा निशाणी घेऊन महिलांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. ढोलताशांच्या गजरात ‘राजेंद्रबाबूजी आगे बढ़ो’च्या लयकारी घोषणाही दुमदुमत होत्या. राजेंद्र दर्डा यांच्या चेहऱ्याचे कटआऊट स्वत:च्या चेहऱ्यावर लावून तरुण उत्साहाने नागरिकांशी हस्तांदोलन करीत होते. ‘राजेंद्र दर्डा हेच, विकासाचा चेहरा,’ असे रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या मतदारांना समजावत होते.
जोरदार स्वागत
राजेंद्र दर्डा, आ. सुभाष झांबड, कदीर मौलाना, माजी नगरसेवक इब्राहीम पटेल, नगरसेवक शेख मुजिबोद्दीन, रमजानी खान, माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान, नगरसेवक असद पटेल, नगरसेवक मीर हिदायत अली, रफिक अहमद, श्रीराम इंगळे आदी नेतेमंडळी उघड्या वाहनात स्वार होऊन मतदारांना अभिवादन करीत होती. रॅलीच्या अग्रभागी तय्यब पटेल, माजी नगरसेवक मोहसीन अहमद, माजी नगरसेविका बिल्कीस बानो, आबेदा बेगम, सलीम कुरैशी, शेख मुनाफ, लक्ष्मण भुतकर आदी नेतेमंडळी होती.
मौलाना आझाद चौकातून रॅली वेगाने रोशनगेट, चंपाचौक, चेलीपुऱ्यामार्गे निझामोद्दीन चौक, राजाबाजार, नवाबपुरा, जिन्सी चौकातून बायजीपुरा, संजयनगरातून मध्यवर्ती जकात नाक्यावर आली. या मार्गावर दुतर्फा त्यांच्या स्वागतासाठी नागरिक ठिकठिकाणी थांबून होते. हारतुऱ्यांनी जागोजागी त्यांचे जंगी स्वागत झाले. बहुमजली इमारतींवर थांबून नागरिक या टोलेजंग पदयात्रेकडे कुतूहलाने पाहत होते. अनेक इमारतींच्या छतावरून राजेंद्र दर्डा यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ज्येष्ठ माता- भगिनींचा उत्साहही अचंबित करणारा होता. त्यांनी धडपडत वाहनावर चढून राजेंद्र दर्डा यांचे स्वागत केले व ‘विजयी भव’च्या शुभेच्छा दिल्या.
लढत काँग्रेस व भाजपामध्येच
जकात नाक्याजवळ पदयात्रेची सांगता झाली तेव्हा, उपस्थितांना उद्देशून कदीर मौलाना म्हणाले की, ही लढाई धर्मनिरपेक्ष व जातीयवादी शक्तीमधील संघर्ष आहे. भाजपा व काँग्रेसमधील या लढाईत एमआयएमने भाजपाची सुपारी घेऊन उमेदवार उभे केले आहेत. मतविभागणी होऊन त्याचा फायदा थेट भाजपालाच होणार आहे. त्यामुळे मतदारांनी सावध व्हावे, असा इशारा त्यांनी युवकांना दिला.
आ. सुभाष झांबड म्हणाले की, या रॅलीत सहभागी झालेला जनसागर पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विजय आपलाच आहे. मतदारांनी नि:संकोचपणे राजेंद्रबाबू दर्डा यांना मतदान करावे, तर राजेंद्र दर्डा म्हणाले की, ही प्रचंड रॅली फक्त ट्रेलर आहे. चित्रपट अजून बाकी आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत कुणीच विश्रांती घेऊ नका, कोणावर विसंबूनही राहू नका, अशा सूचना त्यांनी केल्या.
आविष्कार, साईनगर, सह्याद्री, अरुणोदय कॉलन्यांमध्ये पदयात्रा
औरंगाबाद पूर्वचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारार्थ सोमवारी शहरातील विविध भागांमध्ये पदयात्रा काढण्यात आल्या. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सिडको भागातील आविष्कार कॉलनी, सह्याद्री कॉलनी, अरुणोदय कॉलनी, शुभश्री कॉलनी, साईनगर, सिंहगड कॉलनी, जी-सेक्टर भागातील नागरिकांनी पदयात्रेचे उत्साहात स्वागत केले. पदयात्रेत युवक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्थानिक रहिवाशांनी रॅलीला प्रतिसाद दिला. ‘बाबूजी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता. सिडको भागातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.