राजेंद्र दर्डा यांचा उमेदवारी अर्ज दाखल
By Admin | Updated: September 27, 2014 01:10 IST2014-09-27T00:58:43+5:302014-09-27T01:10:37+5:30
औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

राजेंद्र दर्डा यांचा उमेदवारी अर्ज दाखल
औरंगाबाद : मिरवणूक, शक्तिप्रदर्शनाला फाटा देत, मोजके पदाधिकारी, समाजातील व विविध क्षेत्रातील मान्यवर प्रतिनिधींना सोबत घेऊन काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी शुक्रवारी अत्यंत साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड़ सय्यद अक्रम, प्राचार्य राजाराम राठोड, उद्योजक मानसिंग पवार व युवा राष्ट्रीय कबड्डीपटू सविता दाभाडे हे मान्यवर होते.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती कारले यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला़ उमेदवारी दाखल केल्यानंतर राजेंद्र दर्डा यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले की, उमेदवारी अर्ज सादर करताना सर्व समाज व क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे मान्यवर पाठीराखे म्हणून माझ्यासोबत आहेत, याचा मला आनंद वाटतो. गेल्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात गुंठेवारी भागाच्या विकासापासून ते डीएमआयसीसारख्या औद्योगिक प्रकल्पापर्यंत अनेक विकासकामे मी केली. मतदारांनी संधी दिल्याने हे मी करू शकलो. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी लोक ठामपणे उभे असतात, याचा मला विश्वास आहे.
राजेंद्र दर्डा म्हणाले की, आगामी काळात औरंगाबादच्या विकासाची संकल्पना मांडणारा जाहीरनामा मी येत्या चार दिवसांमध्ये सर्वांसमोर ठेवणार आहे़ विशेष म्हणजे शहरातील ५० हजार नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांचे मत जाणून घेऊन हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. जे लोकांना हवे, तेच येणाऱ्या काळात करण्याचा मी प्रयत्न करणार आहे़ माझ्या शहरातील, जिल्ह्यातील नागरिकांचे जीवन सुरक्षित व सुसह्य व्हावे, यासाठी मी कटिबद्ध आहे.ही निवडणूक दुरंगी-तिरंगीच नव्हे तर बहुरंगी होणार असल्याने यावेळेस मोठी स्पर्धा आहे, असे मला वाटत नाही. उलट पक्षांसोबतच उमेदवाराचे कामही बघितले जाणार आहे़ आजचा मतदार जागरूक असून, ज्या व्यक्तीने काम केले, त्यालाच तो निवडून देणार असल्याचा विश्वास यावेळी राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला़