केरळ रद्दनंतर राजस्थान दौऱ्याच्या हालचाली
By Admin | Updated: July 14, 2016 01:04 IST2016-07-14T00:33:50+5:302016-07-14T01:04:41+5:30
हणमंत गायकवाड , लातूर ऐन दुष्काळात केरळ सहलीचे नियोजन केल्याने मनपातील नगरसेवकांना नागरिकांचा रोष पत्करावा लागला होेता़ विविध संघटनांकडून

केरळ रद्दनंतर राजस्थान दौऱ्याच्या हालचाली
हणमंत गायकवाड , लातूर
ऐन दुष्काळात केरळ सहलीचे नियोजन केल्याने मनपातील नगरसेवकांना नागरिकांचा रोष पत्करावा लागला होेता़ विविध संघटनांकडून तसेच माध्यमांतून अभ्यास दौऱ्यावर टिकेची झोडही उठली होती़ परिणामी, नगरसेवकांनी बॅकफूटवर येत हा अभ्यास दौरा रद्द केला होता़ आता दुष्काळातून सावरतो न् सावरतोच पुन्हा अभ्यास सहलीचे वेध नगरसेवकांना लागले आहेत़ राजस्थानच्या माऊंट अबूवरील हिल स्टेशन पाहण्याचा मोह नगरसेवकांना झाला आहे़ नगरसेवकांनी स्थळ निश्चित केले असले तरी दौऱ्याची तारीख अद्यापि निश्चित केली नाही़ टिका होऊ नये म्हणून दौऱ्याविषयी गुप्तता बाळगली जात असून, सावधपणे पावले उचलली जात आहेत़
गतवर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात नगरसेवकांच्या केरळ अभ्यास दौऱ्याचा बेत आखला होता़ मनपाच्या सभागृहात अधिकृत बैठक घेऊन दौरा ठरला होता़ मात्र दुष्काळ आडवा आला़ दुष्काळात नगरसेवक सहलीवर जात असल्याचे वृत्त शहरात पसरले आणि टिकेची झोड सुरू झाली़ माध्यमांतूनही दौऱ्यावर लाखोंचा खर्च होणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते़ त्यामुळे नगरसेवकांनी नाराज होऊन दौरा रद्द केला़ आता गेल्या पंधरा दिवसांपासून राजस्थान दौऱ्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ गत उन्हाळ्यापासून लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई आहे़ पावसाळयाचा एक महिना उलटूनही टँकरनेच पाणीपुरवठा सुरू आहे़ पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे़ अशा परिस्थितीत नगरसेवकांना आता अभ्यास दौऱ्याचे स्वप्न पडू लागले आहेत़ कसल्याही परिस्थितीत दौरा रद्द होऊ नये, यासाठी खलबते सुरू आहेत़ सध्या ७२ नगरसेवक असलेल्या लातूर मनपातून एकही नगरसेवक उघडपणे दौऱ्याविषयी बोलत नाही़
नियोजित अभ्यास दौऱ्यासाठी साधारणपणे २० लाखांच्या आसपास खर्च होणार आहे़ मनपाची आर्थिक स्थिती अजुनही नाजूक आहे़ नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही, कचरा उचलला जात नाही, त्याचबरोबर कचरा डेपोचाही प्रश्न आहे़ या सर्व प्रश्नावर वेगवेगळी मते मांडून सभागृहात गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांचे या अभ्यास दौऱ्यासाठी मात्र एकमत झाले आहे़ दौऱ्याविषयीची कार्यक्रम पत्रिका ठरली आहे़ परंतू, ती टीका होऊ नये म्हणून जाहीर केली नाही़ बदली झालेले आयुक्त गेल्या चार दिवसांपासून रजेवर आहेत़ ते आल्यानंतर अभ्यास दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित होणार असल्याचे समजते़
पूर्वी एकदा जाहीर झालेला अभ्यास दौरा टंचाईमुळे रद्द करण्यात आला होता़ सध्याही लातूर शहरात पाणीटंचाई आहे़ त्यामुळे अभ्यास दौऱ्याचे नियोजन नाही़ वास्तविक पाहता अभ्यास दौरे झाले पाहिजेत़ अन्य शहरातील नाविण्यपूर्ण योजना पाहून त्याची कृती आपल्याकडे होईल का? यासाठी अभ्यास सहल असते़ ती झाली पाहिजे़ परंतू, सध्या आपली स्थिती बिकट आहे़ मोठा पाऊस पडल्याशिवाय नियोजन केले जाणार नाही, असे काँग्रेसचे मनपा सभागृहातील गटनेते रविशंकर जाधव यांनी सांगितले़