राजा भ्रतहरीनाथ नागपंचमी यात्रोत्सव
By Admin | Updated: August 1, 2014 00:24 IST2014-07-31T23:42:14+5:302014-08-01T00:24:41+5:30
उद्धव चाटे, गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ येथे श्री राजा भ्रर्तहरीनाथ यांची भस्मसमाधी आहे़
राजा भ्रतहरीनाथ नागपंचमी यात्रोत्सव
उद्धव चाटे, गंगाखेड
तालुक्यातील हरंगुळ येथे श्री राजा भ्रर्तहरीनाथ यांची भस्मसमाधी आहे़ सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असल्यामुळे येथे नागपंचमीनिमित्त भव्य यात्रा महोत्सव आयोजित केला जातो़ या महोत्सवात राज्यासह परराज्यातून लाखो भाविकांची उपस्थिती असते़
१ आॅगस्ट रोजी नागपंचमी सणानिमित्त हरंगुळ येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा महोत्सव भरविला जातो़ नागपंचमीनिमित्त यात्रा महोत्सवाचे मोठे धार्मिक महत्त्व आहे़ नाथ संप्रदायातील नऊ नाथांपैकी एक राजा भ्रर्तहरीनाथ महाराज यांची हरंगुळ येथे वस्त्र व भस्म समाधी आहे़ नागपंचमीच्या दिवशी या समाधीला वारूळ पडते व राजा भ्रर्तहरीनाथ नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक वर्षी साप रुपाने भक्तांना दर्शन देण्याकरीता येतात, अशी अख्यायिका आहे़ त्यांचा अवतार राजा विक्रमादित्य समकालीन आहे़ राजा विक्रमादित्यांनी त्यांना भाऊ समजून राज्यभार दिला म्हणून श्री भ्रर्तहरीनाथांना राजा ही उपाधी प्राप्त झाली़ बरीच वर्षे राज्य केल्यानंतर राज वैभवाचा त्याग करून नाथ संप्रदायाच्या प्रचार व लोककल्याणासाठी तप, तपस्या, तीर्थाटन केले़ तीर्थाटन करीत असताना शेवटी ते गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ येथे आले व बरीच वर्षे वास्तव्य केल्यानंतर भक्तांना आपल्या अंगावरचे वस्त्र काढून दिले व या गावात समाधी तयार करा, असे सांगितले़ प्रत्येक वर्षी मी पाताळातून साप रुपाने येऊन तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी दर्शन देईल, असे सांगून ते पाताळात निघून गेले़ त्याप्रमाणे आजही हरंगुळ येथे नागपंचमीच्या दिवशी समाधीला वारुळ पाडून ते भक्तांना दर्शन देतात, अशी या मागची अख्यायिका आहे़
पर्यटनस्थळाकडे दुर्लक्ष
हरंगुळ येथे श्री राजा भ्रर्तहरीनाथाची समाधी आहे़ त्यामुळे या गावाला पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे़ परंतु, याकडे दुर्लक्ष असल्याने भक्तांसाठी सोयी, सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे़ शासनाने सोयी, सुविधा द्याव्यात, अशी प्रतिक्रिया नारायण शिंदे, बाळासाहेब कुलकर्णी, बालासाहेब देशमुख, प्रकाश कुलकर्णी, लक्ष्मीकांत जोशी यांनी दिल्या़
नवसाला पावणारे, चमत्कार दाखविणारे कडू लिंबाच्या पानालाही गोड चव देणारे, माती, वाळूची क्षमताही विषारी सापाला दूर ठेऊ शकणारे श्री क्षेत्र हरंगुळ येथे राजा भ्रर्तहरीनाथ यांचे भव्य मंदिर आहे़ श्री राजा भ्रर्तहरीनाथांनी मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी तपस्या करून शके १७१० मध्ये हरंगुळ येथे आले होते असे सांगितले जाते़ अनेक दिवसांच्या वास्तव्यानंतर ते गुप्त झाले म्हणून येथे नाथाची भस्म समाधी आहे़ या समाधीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीसह इतर राज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात़