उमेदवार निवडीसाठी राज ठाकरे येत्या आठवड्यात औरंगाबादेत
By Admin | Updated: August 23, 2014 00:48 IST2014-08-23T00:25:24+5:302014-08-23T00:48:48+5:30
राज ठाकरे हे येत्या आठवड्यात औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. गटनेते बाळा नांदगावकर यांनी सादर केलेल्या यादीतील इच्छुकांशी संवाद साधून उमेदवारांविषयीचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

उमेदवार निवडीसाठी राज ठाकरे येत्या आठवड्यात औरंगाबादेत
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांवर उमेदवार निश्चित करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या आठवड्यात औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते गटनेते बाळा नांदगावकर यांनी सादर केलेल्या यादीतील इच्छुकांशी संवाद साधून उमेदवारांविषयीचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत मनसेला सपाटून मार खावा लागला. निवडक जागा लढवूनही सर्व जागांवर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु या अपयशानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत:ला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून विधानसभा निवडणुकीत सर्व शक्तिनिशी उतरणार असल्याचे जाहीर केले. या निर्णयानंतर मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर आणि पक्षाच्या इतर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा दौरा करून पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. यानंतर त्यांनी राज ठाकरे यांना जवळपास दीडशेहून अधिक इच्छुकांची यादी सादर केली. त्यातून उमेदवार निवडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादेत येणार आहेत. औरंगाबादेत मराठवाड्यातील एकेका इच्छुकाशी ते संवाद साधून उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय घेणार असल्याचे संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांनी सांगितले.