अस्वच्छतेविषयी खडेबोल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:00 IST2017-09-13T01:00:45+5:302017-09-13T01:00:45+5:30
मॉडेल रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता आणि प्रवाशांच्या असुविधांविषयी मंगळवारी (दि.१२) रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सेवा समितीने ‘दमरे’च्या अधिकाºयांना धारेवर धरत खडेबोल सुनावले

अस्वच्छतेविषयी खडेबोल...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता आणि प्रवाशांच्या असुविधांविषयी मंगळवारी (दि.१२) रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सेवा समितीने ‘दमरे’च्या अधिकाºयांना धारेवर धरत खडेबोल सुनावले. रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वारापासून तर प्लॅटफॉर्मवर जागोजागी अस्वच्छता, तुंबलेले पाणी पाहून देशात यापेक्षा अधिक अस्वच्छता पाहिली नसल्याचे म्हणत समिती सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तात्काळ सुधारणा करण्याची सूचनाही केली.
नाशिक येथे पाहणी करून औरंगाबादेत दाखल झालेले समितीचे निर्मल सिन्हा, अंजू मखिजा, कैलाशनाथ शर्मा, राकेश शाह, पंकजकुमार पाठक, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांचे सचिव लालमणी लाल यांनी रेल्वेस्टेशनवर सकाळी ११ वाजता पाहणी सुरू केली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर, रेल्वेस्टेशनचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, अशोक निकम, राजेश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीमधून प्रवेश करतानाच समितीसमोर रेल्वेस्टेशनवरील असुविधांची पोलखोल सुरू झाली. प्रवेशद्वारातील मेटल डिटेक्टर बंद असल्याचे निदर्शनास येताच सदस्यांची विचारणा केली. त्यानंतर प्रतीक्षालयातील प्रवाशांशी समितीने संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.
प्रतीक्षालयातील स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी एक रुपया आकारण्यात येत असल्याचे पाहून सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. देशात कुठेही अशाप्रकारे लघुशंकेसाठी पैसे घेत नसल्याचे कैलाशनाथ शर्मा म्हणाले, तसेच पुरुष आणि महिला स्वच्छतागृह जोडणाºया भिंतीत खिडकी ठेवल्यासंदर्भात अंजू मखिजा यांनी नाराजी व्यक्त केली. ही खिडकी तात्काळ बंद करण्याची सूचना केली.
प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वरील अस्वच्छता पाहून आरोग्य निरीक्षकांना चांगलेच सुनावले. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी पाणी तुंबले होते. जुन्या इमारतीसमोरील ड्रेनेज चेंबरची अवस्था पाहून सदस्य थक्क झाले. रेल्वेस्टेशनच्या आवारातही ठिकठिकाणी अस्वच्छता समितीच्या निदर्शनास आली. सौंदर्य बेटात कचरा जाळला जात आहे. समिती पाहणी करणार असल्याची माहिती मिळूनही कोणतीही खबरादारी घेतली नसल्याचे सदस्यांनी म्हटले.
एकीकडे पाहणी सुरू होती, तर दुसरीकडे समितीसमोरच स्वच्छतेचे काम सुरू होते. या समितीने वर्षभरात दीडशे रेल्वेस्टेशनची पाहणी केली आहे. नांदेड, परभणी रेल्वेस्टेशनवर पाहणी केल्यानंतर पुढील महिन्यात अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार आहे.